यवतमाळ : सांसद आदर्शग्राम योजनेंतर्गत खासदार विजय दर्डा यांनी दत्तक घेतलेल्या यवतमाळ तालुक्यातील भारी या गावाचा आराखडा राज्यात अव्वल ठरला आहे. पुण्यात आयोजित यशदाच्या कार्यशाळेत यावर शिक्कामोर्तब झाले़ कार्यशाळेत भारी या गावाचा सूक्ष्म नियोजन आराखडा आणि जिओग्राफीक इन्फॉर्मेशन सिस्टिमद्वारे (जीआयएस) मॅपिंग डाटा याचे एमआर सॅककडून सादरीकरण करण्यात आले. यातील सूत्रबद्धता पाहून ‘यशदा’चे संचालक सुमेध गुर्जर यांनी कौतुक केले. सांसद आदर्शग्राम योजनेंतर्गत भारी या गावाची निवड झाल्यानंतर गावाचा परिपूर्ण विकास करण्याचा मनोदय खासदार विजय दर्डा यांनी व्यक्त केला होता. त्यासाठी कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश देण्यात आले. त्यानुसार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी पुढाकार घेत कार्यशाळा घेतल्या. तसेच या गावाची जबाबदारी पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जालंदर पठारे यांच्यावर सोपवली. त्यानुसार गावाचा सूक्ष्म नियोजन आराखडा तयार करण्यात आला. या आराखड्याला जीआयएस आॅनलाइनची जोड देण्यात आली. नकाशासह गावातील प्रत्येक घर, शासकीय इमारती, रस्ते, अंगणवाड्या, शाळा, मंदिर, पाण्याचे स्रोत, जलकुंभ आदींबाबतची माहिती जीआयएसवर अपलोड करण्यात आली. हा आराखडा राष्ट्रीय स्तरावरील परिषदेसाठीही पाठविणार असल्याचे संकेत यशदाकडून देण्यात आले आहेत. त्या दृष्टिकोनातून भारी येथे काम करण्याचे निर्देश एमआर सॅकच्या चमूला देण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)
भारी गावाचा आराखडा राज्यात ‘लय भारी’!
By admin | Updated: April 8, 2015 01:40 IST