पाटेठाण : महिला सबलीकरण केवळ आर्थिक परिस्थितीत सुधारणा करून साध्य होणार नसून, त्यासाठी चांगल्या सृदृढ दर्जाचे आरोग्यदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. सद्य:स्थितीत समाजात निर्माण झालेल्या विकृत प्रवृतीच्या मनोवृत्तीचा सडेतोडपणे सामना करण्यासाठी महिलांनी शारीरिकदृष्ट्या सक्षम असणेदेखील गरजेचे असल्याचे जिल्हा परिषदचे अध्यक्ष प्रदीप कंद यांनी सांगितले. वाळकी येथे स्कोप सेवाभावी संस्था व युको बँक शाखा राहू यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महिला बचत गटांना कर्जवाटप, बँक जोडणी अभियान व महिला मेळावा झाला. कंद म्हणाले, महिलांचे सक्षमीकरण होण्यासाठी त्यांचा सर्वांगीण विकास होणे गरजेचे आहे.यासाठी शारीरिक व मानसिक आरोग्यदेखील महत्त्वाचे आहे. स्वच्छतेच्या दृष्टीने घरोघरी शौचालय असणे चागंल्या आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण असून, महिलांचे आरोग्यमान उंचावण्यासाठी लवकरच प्रतिभासंपन्न आरोग्य योजना राबवली जाईल. यात सुमारे दोन लाख महिलांची हिमोग्लोबीन तपासणी करण्यात येईल. येथील स्कोप सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून महिला बचत गटाचे सुरू असलेले कार्य कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी स्कोप सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून परिसरातील महिला बचत गटांना मंजूर झालेले सुमारे २२ लाख रुपयांचे धनादेश मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. या प्रसंगी राहूबेट परिसरातील विविध बचत गटांच्या महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या. या वेळी पुणे जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा वैशाली नागवडे, जिल्हा परिषद सदस्य बंडोपंत नवले, गटविकास अधिकारी संतोष हराळे, स्कोप सेवाभावी संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष चक्रनारायण स्वामी, युको बँक शाखा मॅनेजर विद्युतमा, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बाळासाहेब थोरात, सरपंच विमल चोरमले, दिलीप हांडे, ग्रामसेविका एम. एस. जाधव, संजय थोरात, राजेंद्र जोंधळे, काका तापकीर, तानाजी थोरात, बाबन शेख यांच्यासह गावातील बहुसंख्य महिला, ग्रामस्थ उपस्थित होते. >स्वच्छतागृह बांधत नाहीतइतिहासात बादशहा शहाजहानने आपल्या पत्नीच्या प्रेमाखातर ताजमहाल बांधला, याचे उदाहरण दाखल्याचा धागा पकडून प्रदीप कंद म्हणाले, ‘‘हल्लीचे तरुण आपल्या आई-वडील, पत्नी यांच्याबाबत केवळ प्रेम दाखवतात; परंतु स्वच्छतागृह बांधत नाहीत. ते असे म्हणताच उपस्थित महिलांनी जोरदार टाळ्या वाजवून दाद दिली. जिल्ह्याची विकासाची उंची गाठण्यासाठी संपूर्ण जिल्हा शौचालययुक्त करण्यासाठी सर्वांचा कृतियुक्त सहभाग असणे गरजेचे असल्याचे कंद यांनी सांगितले.
महिला सबलीकरणासाठी आरोग्य महत्त्वाचे
By admin | Updated: July 21, 2016 01:25 IST