मुंबई : नवीन आणि भाड्यावर घेणाऱ्या शिवनेरी बसेसबाबत अजूनही ठोस निर्णय न झाल्याने एसटीच्या नादुरुस्त एसी शिवनेरी बसमधूनच उन्हाचे चटके सहन करीत प्रवाशांना प्रवास करावा लागत आहे. नवीन शिवनेरी ताफ्यात येणार तरी कधी, असा सवाल उकाड्याने हैराण झालेले प्रवासी उपस्थित करत असले तरी ताफ्यात नवीन बस येण्यास अजूनही बराच काळ लागणार असल्याने उन्हाचे चटके सहन करीतच प्रवाशांना प्रवास करावा लागणार आहे. एसटी महामंडळाकडे जवळपास १७ हजार बसेस असून, यामध्ये ११0 एसी शिवनेरी बस आहेत. मात्र सध्याच्या एसी बसमधून मोठा मनस्ताप सहन करीत प्रवाशांना प्रवास करावा लागत आहे. एसटीच्या ताफ्यातील ११0 एसी शिवनेरी बसेसपैकी फक्त २४ बसेस एसटीच्या स्वत:च्या मालकीच्या आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उर्वरीत भाडेतत्त्वावर असलेल्या ८६ पैकी २५ बसची तीन वर्षांची मुदत कधीच संपली होती. मात्र ही मुदत संपुष्टात आल्यानंतरही त्या प्रवाशांच्या सेवेसाठी धावत होत्या. या बसच्या कंत्राटदारांना एक वर्षाची मुदत वाढवून देण्यात आली आणि ही मुदत लवकरच संपुष्टात येत असली तरीही एसटी महामंडळाकडून नवीन आणि भाड्यावरील बस घेण्यासंदर्भात ठोस असे पाऊल उचलण्यात आलेले नाही. गेल्या सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ एसटी महामंडळ स्वत:च्या मालकीच्या २५ आणि भाड्याच्या ३५ बस घेण्यासाठी निविदा काढत असून, त्या प्रक्रियेतच अडकले आहे. त्यामुळे सध्या जुन्या आणि नादुरुस्त एसी शिवनेरी बसमधूनच प्रवाशांना प्रवास करावा लागत आहे. प्रवासातच अनेक शिवनेरी बसमधील एसी बंद होत आहेत आणि घामाघूम होऊन बंद असलेल्या एसी बसमधूनच पुढील प्रवास प्रवाशांना करावा लागत असल्याचे सांगण्यात आले. एसटी महामंडळाला स्वत:च्या मालकीच्या बस घेण्यासंदर्भातील निविदा प्रक्रियेला काही कंपन्यांकडून प्रतिसाद मिळालेला आहे. मात्र पुढेही बऱ्याच प्रक्रिया असल्याने स्वत:च्या मालकीच्या बस येण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी लागेल, असे सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)
नादुरुस्त शिवनेरी बस अन् उकाड्याने हैराण प्रवासी
By admin | Updated: March 30, 2015 02:57 IST