मुंबई : नाशिक जिल्ह्यातील हरसूल येथील जातीय दंगलीचे तीव्र पडसाद आज विधानसभेत उमटले. या दंगलीवर सरकारने चर्चा करावी आणि तातडीने उपाययोजना कराव्यात या मागणीसाठी विरोधक आक्रमक झाल्यामुळे आज विधानसभेत गोंधळाची स्थिती निर्माण झाली. सरकारने चर्चेची मागणी फेटाळल्याच्या निषेधार्थ शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांच्या नेतृत्वात विरोधी सदस्यांनी सभात्याग केला. प्रश्नोत्तराच्या तासानंतर स्थगन प्रस्तावाच्या सूचना आल्या तेव्हा कम्युनिस्ट पार्टीचे सदस्य जिवा पांडू गावित यांना हरसूलबाबत बोलायचे होते. मात्र पीठासीन अधिकारी चैनसुख संचेती यांनी सांगितले की, कालच तुम्ही यावर बोललेले आहात. मी यावर सरकारला निवेदन करायला सांगतो. अध्यक्षांनी पुढचा विषय पुकारला तेव्हा गावित यांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, शेकापचे गणपतराव देशमुख, दिलीप वळसे पाटील असे सारेच उभे राहिल्याने सभागृहात थोडा काळ गोंधळाची स्थिती झाली. सांसदीय कार्यमंत्री प्रकाश मेहता यांनी विनंती केल्यानंतर अध्यक्षांनी गावित यांना बोलण्याची संधी दिली. गावित म्हणाले, त्र्यंबकेश्वरला कुंभमेळा सुरू झाला आहे व तेथून काही अंतरावर असणाऱ्या हरसूल गावी दंगल सुरू आहे. आजूबाजूच्या गावांत दंगल पसरण्याची शक्यता आहे. तीन दिवस दंगल सुरू होती. मुळात तेथील स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांच्या आडमुठ्या भूमिकेमुळे लोक चिडले आणि त्यांनी हल्ला केला. एक खून झाला. तर पोलिसांनी आकस्मिक मृत्यू अशी नोंद केल्याने लोक भडकले. यावर नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन व महसूल मंत्री खडसे यांनी निवेदन केले. महाजन म्हणाले, मी तेथे दोनवेळा गेलो. स्थिती तणावाची होती, पण आता निवळली आहे. मी पुन्हा तिथे जात आहे व नंतर सोमवारी निवेदन करतो. तेव्हा गणपतराव देशमुख पुन्हा उभे राहिले. पोलीस गोळीबारात एक माणूस मरण पावला आहे. ही बाब गंभीर आहे. तीन दिवस तिथे दंगल आहे ती शमविण्यात सरकारचे अपयश आहे. तेव्हा ताबडतोब चर्चा करावी, असा आग्रह त्यांनी धरला. अध्यक्षांनी पुढचे कामकाज सुरू केले. तेंव्हा विरोधकांना बोलूच द्यायचे नाही ही कोणती पद्धत आहे, असे म्हणत त्यांनी सभात्याग केला.
हरसूल दंगलीवरून विधानसभेत गदारोळ
By admin | Updated: July 17, 2015 23:54 IST