मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येत असलेल्या बारावी परीक्षेचा वाणिज्य शाखेचा बूक किपिंग अॅण्ड अकाउंटसी (बी.के.) विषयाचा पेपर ‘व्हॉटसअॅप’मार्फत फुटल्याच्या चर्चेने विद्यार्थी आणि पालकांची चांगलीच तारांबळ उडाली. चौकशीअंती हा पेपर फुटला नसल्याचा दावा मुंबई मंडळाने केला असून, याबाबतचा अहवाल शिक्षण मंडळाला पाठविण्यात आला आहे. हा पेपर फुटला किंवा नाही, हा निर्णय मंडळामार्फत जाहीर करण्यात येणार आहे.राज्यात दहावी-बारावीची परीक्षा सुरू आहे. सोमवारी बारावीचा वाणिज्य शाखेचा बीके हा पेपर होता. विद्यार्थ्यांना परीक्षेच्या नियोजित वेळेच्या १0 मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका देण्यात येते. सकाळी ११ वाजताचा पेपर असल्याने परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांना १0.५0 वाजता प्रश्नपत्रिका देण्यात आली. पेपर सुरू होताच प्रश्नपत्रिका व्हॉटसअॅपवर पोस्ट केल्याने सर्वत्र पेपर फुटल्याची चर्चा सुरू झाली. पेपर फुटल्याचे फोन मंडळामध्ये खणखणले. प्रश्नपत्रिकाच व्हॉटसअॅपवर फिरू लागल्याने मुंबई विभागीय मंडळाने याची चौकशी सुरू केली. व्हॉटसअॅपवर ११ वाजता पेपर आल्याने मंडळाने हा पेपर फुटला नसल्याचे सांगितले. साडे दहा वाजण्याच्या सुमारास पेपर व्हॉटसअॅपवर आला असता तर तो फुटला असे समजले असते. परंतु तो परीक्षा सुरू झाल्यानंतर बाहेर आल्याने पेपर फुटला असे म्हणता येणार नाही, असा दावा मंडळाचे सचिव एस. वाय. चांदेकर यांनी केला. (प्रतिनिधी)
बारावीचा ‘बीके’चा पेपर फुटल्याच्या चर्चेने गोंधळ
By admin | Updated: March 10, 2015 04:15 IST