नाशिक : गेल्या दोन महिन्यांपासून रात्रंदिवस जागे असलेले, साधूंच्या वास्तव्याने गजबजून गेलेलेआणि भाविकांच्या गर्दीने ओसंडून वाहणारे तपोवनातील साधुग्राम कुंभमेळ्याची तिसरी पर्वणी आटोपताच जवळपास निम्म्याहून अधिक रिकामे झाले आहे. उर्वरित खालशांतही पूर्णत: शुकशुकाट असून, साधू-महंत परतीच्या तयारीत व्यस्त आहेत. दोन दिवसांत साधुग्राम पूर्णत: रिकामे होण्याची चिन्हे आहेत. कुंभमेळ्यासाठी प्रशासनाने तपोवनातील साडेतीनशे एकर जागेत साधुग्राम उभारले. आॅगस्टमध्ये साधुग्राम खऱ्या अर्थाने फुलले होते. कुंभमेळ्याच्या प्रथम दोन पर्वण्या झाल्यानंतर मात्र साधुग्राममध्ये भाविकांचा ओघ घटू लागला. बहुसंख्य साधूही आपल्या मूळ ठिकाणी परतले. साधुग्राममध्ये सकाळपासूनच वाहनांमध्ये सामान भरण्याचे, मंडप सोडण्याचे, कमानी उतरवण्याचे काम सुरू होते. खालशातील भांडी, पलंग, गॅस आदी वस्तूंसह किराणा मालाची पोती, अगदी दुचाकी वाहनेही ट्रक, टेम्पोमध्ये भरली जात होती. भाविकांचे जथ्थेच्या जथ्थे डोक्यावर गाठोडी घेऊन साधुग्रामबाहेर पडत असल्याचे चित्र दिसत होते.काही तुरळक ठिकाणी प्रवचने सुरू होती; मात्र तेथे भाविकांची संख्या फार नव्हती. पुढील दोन दिवसांत साधुग्राम संपूर्णत: रिकामे होण्याचा अंदाज साधूंनी व्यक्त केला आहे. (प्रतिनिधी)भेटू उज्जैनला!एप्रिलमध्ये होणाऱ्या उज्जैनच्या कुंभमेळ्यात पुन्हा भेटण्याची ग्वाही देत साधूंनी एकमेकांचा निरोप घेतला. उज्जैनला एप्रिल व मे महिन्यात कुंभमेळा होणार असून, तत्पूर्वी डिसेंबर-जानेवारीत अलाहाबादला माघ मेळाही भरणार आहे.देणे-घेणे पूर्ण : साधू-महंतांतील हिशेब, आर्थिक देणे-घेणे शुक्रवारी रात्रीच पूर्ण करण्यात आले. सकाळी तिसरे शाहीस्नान करून साधुग्राममध्ये आल्यावरच साधू-महंतांनी व्यवहार पूर्ण केले. कुंभमेळा संपल्यावर आखाडे-खालशांमध्ये ‘बिदाई’ देण्याची प्रक्रियाही रात्रीच पूर्ण झाल्याचे साधूंनी सांगितले.
नाशिकमधील निम्मे साधुग्राम रिकामे
By admin | Updated: September 19, 2015 23:24 IST