एफडीए : १४ नमुने प्रयोगशाळेत
मुंबई : मॅगीमध्ये आरोग्यास हानिकारक पदार्थ आढळल्यानंतर देशात मॅगीवर बंदी आणण्यात आली. यानंतर आता हल्दीरामची उत्पादने अन्न व औषध प्रशासनाच्या रडारावर आली आहेत. नागपूर येथील हल्दीरामच्या कारखान्यातून १४ नमुने घेऊन मुंबईतील एफडीएच्या मुख्यालयातील प्रयोगशाळेत तपासणीसाठी आणण्यात आली आहेत.अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री विद्या ठाकूर यांनी दिलेल्या आदेशांनुसार हल्दीरामच्या उत्पादनाची तपासणी करण्याचे आदेश दिले होते. राज्यभरातून नमुने गोळा करण्यापेक्षा नागपूरच्या कारखान्यातून १४ नमुने घेण्यात आले, अशी माहिती एफडीएच्या सहाय्यक आयुक्त उदय वंजारी यांनी दिली.अमेरिकेत हल्दीरामच्या उत्पादनांना बंदी घालण्यात आली आहे. या उत्पादनांमध्ये आरोग्यास हानिकारक असणाऱ्या पदार्थ आढळल्याने हे पाऊल उचलण्यात आले आहे. अमेरिकेतील हल्दीरामच्या उत्पादनांमध्ये कीटकनाशके आणि इतर काही आरोग्यास हानिकारक असणारे घटक आढळून आल्याने ठाकूर यांनी राज्यातील उत्पादनांची तपासणी करण्याचे आदेश दिले होते. राज्यात हल्दीरामच्या उत्पादनाच्या विक्रीचे प्रमाण जास्त आहे. यामुळेच या उत्पादनांची तपासणी करण्याचे आदेश एफडीएला देण्यात आले. ही तपासणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश ठाकूर यांनी दिले आहेत.