प्रदीप शिंदे, कोल्हापूरआपला शिक्षकीपेशा एका चौकटीत न ठेवता विद्यार्थ्यांना हे सामाजिक जाणिवेसोबत व्यवहारज्ञानही मिळावे यासाठी शाळेत अंधश्रद्धा निर्मूलनापासून बाजार भरवण्यासारखे विविध अभिनव उपक्रम सातत्याने राबवत विद्यार्थ्यांना परिपूर्ण करण्यासाठी धडपडणाऱ्या मुख्याध्यापिका म्हणजे नंदिनी अंमणगीकर होय. कोल्हापुरातील तोरणानगर येथील सरस्वती चुनेकर विद्यालयातील मुख्याध्यापिका नंदिनी अंमणगीकर यांचा जन्म आष्टा (ता. वाळवा, जिल्हा सांगली) येथे झाला. आई-वडील शिक्षक असल्याने लहानपणापासून अभ्यासाची गोडी लागली होती. आई-वडील दोघेही गावातील गरीब मुलांची शिकवणी घेत होते. दुसऱ्याला मदतीचा हात देण्याची त्यांची ही प्रवृत्ती व प्रेरणा घेत त्यांनाही लहानपणापासून समाजसेवेची आवड निर्माण झाली. सातवीमध्ये असतानाच त्याही घराशेजारील मुलांना शिकवू लागल्या. पदवी पूर्ण केल्यानंतर पुणे येथून बी.एड्.केले. पदवी घेतल्यानंतर त्यांचे कोल्हापुरात लग्न ठरले. त्यांचे पती सार्वजनिक बांधकाम विभागात अभियंता होते, तर सासरे सरकारी अधिकारी व सासूही महापालिकेच्या शाळेत शिक्षिका होत्या. या ठिकाणीही माहेरासारखीच त्यांच्या सासूबार्इंना दुसऱ्यांना सतत मदत करण्याची सवय असल्याने माहेरप्रमाणेच त्यांना समाजकार्याची सासरीही प्रेरणा मिळाली. कोल्हापुरातील सरस्वती चुनेकर विद्यामंदिरात १९८८ मध्ये त्या साहाय्यक शिक्षिका म्हणून दाखल झाल्या. या शाळेत दौलतनगर, शाहूनगर, राजेंद्रनगर या ठिकाणच्या गरीब मुलांची मोठी संख्या होती. त्यांच्यासाठी काहीतरी करायचे, या उद्देशाने त्यांनी शाळेत नवनवीन उपक्रम राबविण्यास सुरुवात केली. मुलांशी आपुलकीने बोलणे, त्यांचे प्रश्न सोडविणे, एखाद्या वेळेस कोणत्या मुलाकडे पुस्तक-वही नसेल तर त्याला आपल्याजवळील पुस्तक-वही देणे तसेच मुलांना बाहुल्यांच्या माध्यमातून अवघड विषय सोप्या भाषेत करून शिकविण्यात त्यांची ‘विशेष खासियत’ असल्याने अवघ्या काही दिवसांत त्या मुलांच्या आवडत्या शिक्षिका बनल्या. १९९५ मध्ये त्यांना मुख्याध्यापकपदी बढती मिळाली. शाळेमध्ये मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी, तसेच मध्यमवर्गीय कुटुंबांतील मुलांचा मोठा सहभाग होता. त्यामुळे त्यांच्यावर अंधश्रद्धेचा मोठा पगडा होता. शाळेत अंधश्रद्धा निर्मूलनाचे प्रयोग सादर करून ती कमी करण्याचे त्यांचे प्रयत्न आजही सुरूच आहेत. शाळेमध्ये होळी पौर्णिमेला ‘पोळी वाचवा’ हा उपक्रम त्यांनी हाती घेतला. त्याची सुरुवात आपल्या घरातून केली.दुष्काळग्रस्तांना ‘मूठ मूठ धान्य द्या’ असे आवाहन मुलांना केले होते. शालेय पोषण आहारांतर्गत शाळेत पोषण आहार शिजवून देण्यासाठी अनेक शाळांनी विरोध केला होता. मात्र त्यांनी शाळेतील मुलांना दर्जेदार आहार मिळण्यासाठी संस्थेच्या मदतीने कोल्हापूर शहरात पहिल्यांदाच पोषण आहार शिजवून देण्याचा उपक्रम राबविला. वाढदिवसादिवशी विद्यार्थ्यांनी शाळेत गोळ्या-चॉकलेट न वाटता शाळेतील ग्रंथालयात पुस्तके द्या, असे आवाहन करून घरोघरी जाऊन ग्रंथालयासाठी २ हजार ४०० जुनी पुस्तके गोळा करून विद्यार्थ्यांसाठी ग्रंथालय सुरू केले. हे ग्रंथालय फक्त शाळेतील विद्यार्थ्यांसाठी खुले न करता पालकांसाठीही खुले केले. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांनाही वाचनाची आवड निर्माण झाली आहे. मुलांना पुस्तकी ज्ञानासोबत पैशाचे व्यवहार कळावेत, या उद्देशाने शाळेत बाजार सुरू केला. त्यामध्ये काही मुले विक्रेते, तर काही मुले खरेदीदार होतात. त्यांच्या या समाजाभिमुख कामाबद्दल त्यांना लायन्स क्लब व कोल्हापूर महानगरपालिकेतर्फे ‘आदर्श शिक्षिका’ पुरस्कार देण्यात आला आहे.
विद्यार्थ्यांना व्यवहारज्ञान देणारा गुरू
By admin | Updated: September 27, 2014 06:17 IST