खामगाव : गुप्तीने भोसकून युवकाचा खून केल्याची घटना ४ जानेवारी सोमवारी शहरातील भुसावळ चौकात रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास घडली. याबाबत प्राप्त माहितीनुसार, शहरातील सतीफैल भागातील अभिनव ऊर्फ सोनू तायडे (वय २२) हा युवक ४ जानेवारी रोजी रात्री भुसावळ चौकातील आठवडी बाजाराकडे जाणार्या रस्त्यावर उभा होता. यावेळी काही तरुणांनी अचानक दुचाकीने तेथे येऊन अभिनव ऊर्फ सोनू तायडे याच्यावर गुप्तीने वार केले. या हल्ल्यात अभिनव तायडे हा गंभीर जखमी झाला. त्यामुळे त्यास तातडीने उपचारासाठी स्थानिक सामान्य रुग्णालयात आणण्यात आले; मात्र अभिनव तायडे याचा मृत्यू झाला. खून कोणत्या कारणाने झाला, तसेच अज्ञात मारेकरी कोण, हे वृत्त लिहिपर्यंत निष्पन्न झाले नव्हते. याप्रकरणी रात्री उशिरापयर्ंत पोलिसांची कारवाई सुरू होती. या घटनेनंतर सामान्य रुग्णालयात मोठा जमाव झाला होता. घटनेचे गांभीर्य पाहून अपर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके यांनी घटनास्थळी तसेच सामान्य रुग्णालयात भेट दिली व परिस्थितीची पाहणी केली. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता, तर घटनेची माहिती मिळाल्यानंतर भारिप-बमसं जिल्हाध्यक्ष अशोक सोनोने यांनीही सामान्य रुग्णालयात भेट देऊन शांततेचे आवाहन केले. मृतक अभिनव तायडे हा वडील वारल्याने खामगाव येथे न्यायालयात लिपिक म्हणून काम करणारे मामा देवीदास धुरंधर यांच्याकडे त्याच्या आईसोबत राहत होता.
गुप्तीने भोसकून युवकाचा खून
By admin | Updated: January 5, 2016 02:02 IST