असगोली (रत्नागिरी) : गुहागर एज्युकेशन सोसायटीच्या पहिल्याच निवडणुकीत रविवारी जोरदार हाणामारी झाली. यंत्रणेत त्रुटी असल्यामुळे निवडणूक घेऊ नये, अशी मागणी करणारा गट आणि निवडणुकीवर ठाम असलेल्या गटाचे समर्थक एकमेकांवर धावून गेले. नगराध्यक्ष जयदेव मोरे यांनी संस्थेचे सचिव उदय जोशी यांच्या थोबाडीत मारली. त्यानंतर हाणामारीस सुरुवात झाली. कार्यकर्त्यांनी खुर्च्यांची मोडतोड केली. हाणामारीचा प्रकार वाढल्याने पोलिसांना पाचारण करण्यात आले. त्यानंतर निवडणूक प्रक्रिया पार पडली. सभेचे वातावरण सुरुवातीपासून चांगलेच तापले होते. मागील इतिवृत्त वाचन होऊन त्याला काही दुरुस्त्या सुचवून मंजुरी देण्यात आली. त्यानंतर पुढील पाच वर्षांच्या अंदाजपत्रकाचे वाचनही काही सूचना देत मंजूर करण्यात आले.मात्र त्यानंतर निवडणूक प्रक्रिया होणार असल्याचे अध्यक्ष महेश भोसले यांनी जाहीर केले. त्याला माजी पदाधिकारी किरण खरे यांनी विरोध केला. मतदार यादी परिपूर्ण नसल्याचा आक्षेप त्यांनी घेतला. तसेच २३ सदस्यांचे सह्यांनिशी पत्र अध्यक्षांना दिले. मात्र विरोधकांची मते नोंदवली असून, निवडणूक प्रक्रिया सुरू करण्यात येत असल्याचे भोसले यांनी जाहीर करताच विरोधकांनी त्यांच्या टेबलासमोर जाऊन हुज्जत घालण्यास सुरुवात केली. त्याचवेळी जयदेव मोरे यांचा स्वत:वरील ताबा सुटला आणि त्यांनी उदय जोशी यांच्या श्रीमुखात ठेवल्या. त्यानंतर दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. मारहाण झालेल्या पराग शंकर मालप यांनी गुहागर पोलीस ठाण्यात रोहन नवनाथ भोसले, समीर देवकर, प्रकाश मारुती कचरेकर, मिलिंद सुर्वे यांच्याविरोधात ठार मारण्याची धमकी देत मारहाण केल्याची तक्रार दाखल केली. (प्रतिनिधी)
गुहागर शिक्षण संस्थेच्या निवडणुकीत हाणामारी!
By admin | Updated: December 29, 2014 05:04 IST