लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : जीएसटीमुळे देशात मोठ्या अर्थक्रांतीची सुरूवात झाल्याचे सांगून अशा प्रकारची करप्रणाली तयार करणारा भारत हा एकमेव देश असल्याचा दावा केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी केला. ते ठाण्यात एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आले होते. त्यावेळी त्यांना हा दावा केला. तसेच भारताला क्रमांक एकचा देश बनवायचा असेल, तर आधी दोन नंबरचा व्यवसाय बंद करावा लागेल, असे त्यांनी यावेळी सांगितले. टीपटॉप प्लाझा येथे रामभाऊ म्हाळगी प्रबोधनी, टीजेएसबी बँक आणि लेखापाल संघटनेच्यावतीने शुक्रवारी वस्तू व सेवाकरासंदर्भात कार्यक्रम झाला. जीएसटीमुळे आर्थिक व्यवहारांमध्ये पारदर्शकता येणार आहे. त्यामुळे या कराच्या माध्यमातून देशामध्ये मोठ्या अर्थक्रांतीची सुरुवात झाली आहे, असेही त्यांनी सांगितले. २२ राज्यांतील सीमातपासणीनाके बंद झाल्यामुळे येथून प्रवास करणाऱ्या मालवाहू वाहनांचा ३० टक्के वेळ वाचत आहे. त्याचा फायदा विविध कंपन्यांना होऊ लागला आहे, असेही त्यांनी सांगितले. या कराची अंमलबजावणी केल्यानंतर नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. परंतु, त्यावर मात करण्यासाठी केंद्राने सेवा केंद्र आणि कॉलसेंटर अशी यंत्रणा उभारली असल्याचे त्यांनी सांगितले . वस्तूव सेवाकराच्या अर्थक्रांतीमुळे देशातील गरीब हा गरीब राहणार नाही, मध्यमवर्गीय श्रीमंत होण्याच्या दिशेने वाटचाल करेल आणि श्रीमंतांचाही आर्थिक दर्जा आणखी उंचावेल, असा दावा राज्यसभेचे खासदार विनय सहस्रबुद्धे यांनी यावेळी बोलताना केला.... तर कर भरावा लागेलसध्या भारताचा विकासदर चीनपेक्षा चार टक्क्यांनी कमी आहे. भारत आणि चीनचे सैन्यदल एकमेकांसमोर आले आहेत. त्यामुळे चीनसोबत दोन हात करायचे असतील, तर आपल्याला कराचा भरणा करून विकासदर वाढवणे गरजेचे असल्याचे राज्यमंत्री सिन्हा यांनी स्पष्ट केले.
‘जीएसटीमुळे अर्थक्रांतीची सुरुवात’
By admin | Updated: July 15, 2017 03:21 IST