बीड : भगव्या पताका, डोक्यावर तुळशी वृंदावन, मुखी ‘ज्ञानोबा-तुकाराम’ जयघोष अशा भक्तिमय वातावरणात रविवारी सकाळी संत मुक्ताबाई व संत ज्ञानेश्वरांचे आजोबा गोविंदपंत ऊर्फ श्रीधरपंत यांच्या भेटीचा सोहळा बीडमध्ये पार पडला. यावेळी शेकडो वारकरी व भाविकांनी हा क्षण ‘याचि देही याचि डोळा’ अनुभवला. संत मुक्ताबार्इंची पालखी मुक्ताईनगरातून पंढरपूरकडे निघाली आहे. दोन दिवस या दिंडीचा मुक्काम बीडमधील बालाजी मंदिरात होता. रविवारी ही पालखी सकाळी साडेसहा वाजता जैन भवनाजवळील गोविंदपंत ऊर्फ श्रीधरपंत यांच्या समाधीस्थळी दाखल झाली. यावेळी संत मुक्ताबार्इंच्या आजोबांच्या समाधीजवळ डॉ. रामदास यांच्याहस्ते पादुकापूजन करण्यात आले. (वार्ताहर)>संत मुक्ताबाई ही गोविंदपंतांची नात असल्यामुळे साडी-चोळी देऊन तिची बोळवण करण्यात आली. हा सोहळा उपस्थितांनी मोठ्या भावभक्तीने डोळ्यात साठविला. गेल्या अनेक वर्षांपासून आजोबा-नातीच्या या भेटीचा सोहळा होतो.
आजोबा-नातीच्या भेटीचा रंगला भक्तिमय सोहळा
By admin | Updated: July 4, 2016 04:33 IST