मुंबई : अमेरिकेतील मिसिसिपी राज्याचे गव्हर्नर फिल ब्रायंत यांच्या शिष्टमंडळाने बुधवारी राज्यपाल चे. विद्यासागर राव व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राजभवन येथे भेट घेतली. कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर, उद्योगमंत्री सुभाष देसाई, मुख्य सचिव सुमित मल्लिक, आदी या वेळी उपस्थित होते.या वेळी हवाई वाहतूक, आॅटोमोबाइल, कृषी उत्पादन, पर्यटन आदी विषयांवर चर्चा झाली. ‘या चर्चेमुळे उभय राज्यांतील संबंध वृद्धिंगत होण्यास मदत होईल. हवाई वाहतूक, वाहन उत्पादन, कृषी क्षेत्रात आमच्याकडे मोठे संशोधन झाले आहे. याचा फायदा महाराष्ट्राला होईल. तसेच मिसिसिपी राज्य हे पर्यटन वाढीसाठीही प्रयत्न करत आहे,’ असे ब्रायंत म्हणाले.पर्यटकांना महाराष्ट्राकडे आकर्षित करण्यासाठी मिसिसिपीमध्ये ‘रोड शो’ आयोजित करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी या वेळी सांगितले. कृषी उत्पादन वाढविण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करत असून, त्यासाठी मिसिसिपीचे सहकार्य मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी उत्पादन दुप्पट करण्यास प्राधान्य दिल्याने या क्षेत्रात मोठा वाव असल्याचे राज्यपाल राव यांनी परदेशी शिष्टमंडळास सांगितले.
मिसिसिपीच्या गव्हर्नरनी घेतली राज्यपाल, मुख्यमंत्र्यांची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 04:55 IST