सूर्यकांत वाघमारे , नवी मुंबईसांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांच्या अनुपस्थितीमुळे संतप्त नागरिकांनी शासनाचा कार्यक्रम उधळून लावल्याचा प्रकार मंगळवारी रात्री वाशीत घडला. पाहुण्यांनीच दांडी मारल्याने कार्यक्रमास उपस्थित सांस्कृतिक विभागाच्या एकमेव अधिकाऱ्याने पुरस्कार विजेत्यांनाच एकमेकांच्या हातून पुरस्कार देण्याचे सुचवले. त्यामुळे संतप्त पुरस्कार विजेत्यांनी गोंधळ घालत हा कार्यक्रम उधळून लावला.राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्यसंचालनालयाच्या वतीने वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात या पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या लोकमान्य टिळक महोत्सवाअंतर्गत सार्वजनिक गणेशोत्सव सजावट समारंभातील विजेत्यांना पुरस्कृत केले जाणार होते. सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होणाऱ्या या कार्यक्रमास मुंबई व ठाणे विभागातील स्पर्धक व विजेते मोठ्या संख्येने उपस्थित होते. संध्याकाळी ४ वाजता सुरू होणारा कार्यक्रम तावडे यांची वाट पाहत बसल्यामुळे ६.३० वाजले, तरीही सुरू झाला नव्हता. अखेर नाट्यगृहाची ७ वाजेपर्यंतची मुदत संपली. मंत्री तावडे यांनी दांडी मारल्याचे स्पष्ट होताच त्याठिकाणी उपस्थित सांस्कृतिक विभागाच्या एकमेव अधिकाऱ्याने कार्यक्रमाला सुरुवात केली. उपस्थित विजेत्यांना एकमेकांच्या हातून पुरस्कार देऊन त्यांनी कार्यक्रम पार पाडण्याचा प्रयत्न केला. नियोजनाचा अभाव व प्रमुख पाहुण्यांची दांडी यामुळे शासनाच्या या कार्यक्रमाचा पुरता फज्जा उडाला.
शासकीय कार्यक्रमाचा फज्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2017 03:05 IST