लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : पश्चिम विदर्भातील (वऱ्हाड) दुधाची आवक घटल्याने त्याचा थेट परिणाम शासकीय दूध योजनांवर होत असून, शासकीय दूध योजनांतील उत्पादन बंद पडण्याच्या मार्गावर आहे. याची सर्वाधिक झळ अकोला येथील दूध योजनेला बसली आहे. जिल्ह्यातील दुध पुरवठा बंद झाल्याने वर्धा येथील सीमित दुधावर ही योजना शेवटच्या घटका मोजत आहे.पश्चिम विदर्भातील शासकीय दूध योजनांना होणारा दुधाचा पुरवठा जवळपास बंद झाला आहे. अकोला जिल्ह्याची गरज भागविण्यासाठी दोन दिवसांपूर्वी वर्धा येथील शासकीय दूध योजनेकडे सात हजार लीटर दुधाची मागणी करण्यात आली होती; परंतु यापुढे वर्धा येथील दूध अकोल्याला मिळेल, याची शाश्वती नसल्याने ही शासकीय योजना बंद पडण्याच्या मार्गावर आहे.अकोला येथे वऱ्हाडातील मोठी शासकीय दूध योजना आहे. या जिल्ह्याला दररोज तीन लाख लीटरपेक्षा अधिक दुधाची आवश्यकता आहे; परंतु सध्या तेवढे दुधाचे उत्पादन येथे होत नसल्यामुळे इतर जिल्ह्यातील खासगी कंपन्यांचे दूध या जिल्ह्यात विकले जात आहे. या योजनेकडे मार्च, एप्रिलमध्ये काही प्रमाणात दुधाची आवक होती; परंतु मे महिन्यात अचानक दुधाचे संकलन घटले आहे. यामुळे चार हजार लीटर दूध जेथे मिळत होते, तेथे आता नाममात्र दुधाचा पुरवठा होत आहे. शासकीय दूध योजनेतून होणारा शुद्ध दुधाचा पुरवठा कमी झाल्याने ग्राहकांना जास्तीचे पैसे मोजून खासगी कंपन्यांचे दूध खरेदी करावे लागत आहे. काही खासगी कंपन्यांच्या दुधामध्ये सातत्याने भेसळीचे प्रमाण आढळत असते. त्यामुळे ग्राहकांना शासकीय दूध योजनेच्या दुधाची आस असते. वऱ्हाडातील दूध उत्पादक संघामार्फत शासकीय दूध योजनांना दुधाचा पुरवठा केला जातो. सध्या अमरावतीला यवतमाळ येथून दुधाचा पुरवठा केला जात आहे. अकोला जिल्ह्यातील अकोट, मूर्तिजापूर आदी ठिकाणची दुधाची आवक बंद आहे. वाशिम जिल्ह्यातही दूध उत्पादक संघाकडे दूध नाही. चिखली येथे २०० लीटर दुध उपलब्ध आहे. पण, ते वाहतुकीस परवडत नसल्याने तेथून अकोल्याला होणारा दुधाचा पुरवठा बंद आहे. जिल्हा सहकारी प्राथमिक दूध उत्पादकांचा संघाने याबाबतीत पुढाकार घेण्याची गरज आहे.अकोला शासकीय दूध योजनेकडे होणारी दुधाची आवक कमी झाली आहे. त्यामुळे वर्धा येथील योजनेकडे दुधाची मागणी केली होती.- निरंजन कदम, पाळी व्यवस्थापक, शासकीय दूध योजना, अकोला.
वऱ्हाडातील शासकीय दूध योजना बंद पडण्याच्या मार्गावर!
By admin | Updated: May 23, 2017 01:44 IST