नाशिक : वाहतूकदारांच्या दरात शासनाने दुपटीने वाढ केल्यामुळे अन्नधान्य महामंडळातून थेट रेशन दुकानदाराच्या दारापर्यंत धान्य वाहतुकीचा मार्ग मोकळा झाला असून, यासंदर्भात अन्न व नागरी पुरवठा खात्याने घेतलेल्या निर्णयामुळे रेशनचा काळाबाजार रोखण्यास मदत होणार आहे.दोन वर्षांपूर्वी नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा येथील कोट्यवधी रुपये किमतीच्या धान्य घोटाळ्यानंतर शासनाने रेशनचे धान्य वाहतूकदारांच्या मुसक्या आवळल्याने राज्यात शासकीय धान्याची वाहतूक करणाऱ्यांनी टप्प्याटप्प्याने धान्य वाहतूक करण्यास नकार देत काम बंद केले होते. अल्प वाहतूक दर मिळत असल्याचे सांगत शासकीय धान्याची वाहतूक करण्यास त्यांनी नकार दिला होता. त्यामुळे सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत धान्य वाटपात अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यावर उपाय म्हणून खासगी वाहतूकदारांकडून तर काही ठिकाणी थेट आरटीओमार्फत वाहने अधिग्रहित करून दर महिन्याच्या धान्याची वाहतूक सुरू करण्यात आली. शासकीय गोदाम अथवा अन्नधान्य महामंडळाच्या गोदामातून थेट रेशन दुकानापर्यंत अन्नधान्याची वाहतूक करण्यासाठी शासकीय पातळीवर वेळोवेळी निविदा मागविण्यात आल्या, परंतु अत्यंत अल्प दर व जाचक नियम, निकषांमुळे निविदा भरण्यास वाहतूकदारांनी अनुत्सुकता दर्शविल्याने एकाही जिल्ह्यात वाहतूकदार धान्य वाहतुकीसाठी पुढे आले नाहीत. त्यामुळे वाहतुकीचे दर वाढवून द्यावेत याबाबत शासकीय पातळीवर बऱ्याच महिन्यांपासून विचार केला जात होता. अखेर गेल्या आठवड्यात शासनाने निर्णय घेऊन वाहतूक दरात दुपटीने वाढ केली. वाहतूकदारांना काही नियम व निकषही लागू केले आहेत. (प्रतिनिधी)
शासकीय धान्य वाहतुकीचा मार्ग मोकळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2017 02:26 IST