मुंबई : विधानसभेतील प्रश्नोत्तराच्या तासात मनरेगाअंतर्गत शेतकऱ्यांच्या प्रलंबित देयकांचा मुद्दा बुधवारी जोरदार गाजला. गरीब शेतकऱ्यांनी मनरेगाअंतर्गत घेतलेल्या विहिरींच्या कुशल कामाचे पैसे अनेक वर्षांपासून रखडल्याने सरकारचा निषेध करत विरोधकांनी सभात्याग केला.भाजप आमदार नारायण कुचे यांनी बदनापूर-अंबडमध्ये मनरेगाअंतर्गत शेतकऱ्यांनी सुमारे ६०० विहिरी खोदल्या. अनेकांनी कर्ज काढून कामे पूर्ण केली. मात्र, कुशल कामाचे पैसे अजून मिळालेले नाहीत. अनेक भागांमध्येही अशीच परिस्थिती असल्याचे त्यांनी नमूद केले.यावर मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले की, कुशल कामाची २८०० कोटी रुपयांची देयके प्रलंबित होती, त्यापैकी १,०३५ कोटीचे वितरण केले आहे. केंद्र सरकारने ‘स्पर्श’ नावाची नवी प्रणाली लागू केली आहे. त्यानुसार केंद्राचा हिस्सा आल्यानंतर राज्याचा हिस्सा नव्या पद्धतीने जमा करावा लागतो आणि त्यानंतर निधी एकत्रितपणे लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होतो. ही प्रणाली सुरळीत होण्यासाठी थोडा कालावधी लागेल, मात्र एका महिन्यात प्रक्रिया सुरळीत करून पैसे दिले जातील.
इतका उशीर करणार असाल तर गरीब शेतकऱ्यांना व्याज देणार का? -गडचिरोलीसारख्या जिल्ह्यांमध्ये रोजगाराच्या संधी मर्यादित असल्याने मनरेगा हीच नागरिकांसाठी महत्त्वाची योजना असल्याचे सांगत काँग्रेस आमदार नितीन राऊत यांनी देयके तातडीने देण्याची मागणी केली.काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी चार वर्षांपासून काही शेतकऱ्यांना पैसे मिळाले नसल्याचा आरोप केला. मनरेगा ही शेतकऱ्यांना आधार देणारी योजना असून राज्य आणि केंद्र सरकारच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यांना आपली जमीन विकून पैसे द्यावे लागल्याची वेळ आली असल्याचे त्यांनी सांगितले. इतक्या उशिराने पैसे देणार असाल तर ते व्याजासह देणार का, असा सवालही त्यांनी केला.
सरकार केवळ फुशारक्या मारतंय...अजित पवार गटाचे आ. प्रकाश सोळंके यांनी राज्यातील कुशल कामाची एकूण किती देयके प्रलंबित आहेत, याची माहिती मागितली. दरम्यान, उद्धवसेनेचे आ. भास्कर जाधव यांनी जोरदार टीका करत, हातावर पोट भरणाऱ्या शेतकऱ्यांचे चार-चार वर्षे पैसे रखडणे अयोग्य असल्याचे सांगितले. गोरगरिबांचे पैसे प्रलंबित ठेवून सरकार फुशारक्या मारत असल्याचा आरोप करत त्यांनी सरकारचा निषेध व्यक्त केला आणि विरोधी पक्षांनी सभात्यागाची घोषणा केली.
Web Summary : Opposition protested delayed MNREGA payments in Maharashtra assembly. Farmers face hardship due to pending dues for years. Minister assured resolution within a month but faced criticism. Opposition staged a walkout, protesting government inaction.
Web Summary : महाराष्ट्र विधानसभा में मनरेगा भुगतान में देरी पर विपक्ष का विरोध। किसान वर्षों से लंबित बकाये के कारण कठिनाइयों का सामना कर रहे हैं। मंत्री ने एक महीने के भीतर समाधान का आश्वासन दिया लेकिन आलोचना का सामना करना पड़ा। विपक्ष ने सरकार की निष्क्रियता का विरोध करते हुए बहिर्गमन किया।