श्रीनारायण तिवारी ल्ल मुंबईराज्यातील सरकारी दवाखान्यांतील औषध भांडारात मोठ्या प्रमाणात ‘निकृष्ट दर्जाचा’ साठा आढळल्यानंतर राज्याचा अन्न व औषध प्रशासन विभाग जागा झाला आहे. छत्तीसगडमधील विषारी औषध प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर विभागाने राज्यातील सर्व सरकारी दवाखान्यांच्या औषध भांडारातील साठ्याची ‘चाचणी’ करण्याचा निर्णय घेतला आहे.याअंतर्गत प्रशासनाने आतापर्यंत राज्यातील २८१ रुग्णालयांची ‘अचानक तपासणी’ केली असून तेथून ३३५ नमुने जप्त केले. एवढेच नाही तर अयोग्य पद्धतीने औषधांचा साठा ठेवल्याबद्दल संबंधितांविरुद्ध ‘विभागीय कारवाई अहवाल’ पाठविण्याचेही आदेश दिले आहेत. यामुळे राज्याच्या सरकारी रुग्णालयांत काम करणारे फार्मासिस्ट व कर्मचारी यांच्यात खळबळ उडाली आहे.एफडीए सूत्रांच्या मते, गेल्या वर्षी सरकारी रुग्णालयांतून जप्त करण्यात आलेला औषध नमुना मोठ्या प्रमाणात ‘निकृष्ट दर्जा’चा असल्याचे आढळले होते. प्रशासनाने तात्काळ त्याच्या वितरणावर बंदी घातली होती; मात्र तोपर्यंत छत्तीसगड विषारी औषध प्रकरण घडून गेले होते. या प्रकरणात सरकारी रुग्णालयातील औषधांत विषारी द्रव मिसळल्याने अनेकांचा जीव गेला होता. यावरून धडा घेत औषध प्रशासनाने राज्यात सर्व ‘सरकारी संस्थां’चे औषध साठे तपासायचा निर्णय घेतला आहे.अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त डॉक्टर पुरुषोत्तम भापकर यांनी राज्यातील सर्व अन्न औषध निरीक्षकांना एकाच वेळी अचानक तपासणी हाती घेण्याचे निर्देश दिले होते. १२, १३ आणि १४ जानेवारी रोजी राज्यभरात विशेष मोहीम राबविण्यात आली. यात १८१ ठिकाणी अचानक तपासणी करण्यात आली आणि ३३५ नमुने गोळा करण्यात आले.च्तीन दिवसांच्या विशेष मोहिमेदरम्यान सर्वाधिक ठिकाणी औरंगाबाद विभागातील पथकाने पाहणी केली. विभागातील पथकाने एकुण ६१ रुग्णालयांची अचानक पाहणी केली, यानंतर कोकणचे स्थान राहिले.१०० टक्के नमुने गोळा करणारच्सरकारी रुग्णालयातून १०० टक्के नमुने गोळा करण्याचे आमचे लक्ष्य आहे. आता केवळ तीन दिवसांची मोहिम पुर्ण झाली आहे. आगामी काळात सातत्याने अभियान राबविले जाईल. गोळा करण्यात आलेले नमूने एफडीएच्या मूंबई व औरंगाबाद प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले असून यांचा अहवाल येणे बाकी असल्याचे एफडीएचे आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांनी सांगितले.
सरकारी औषधांची होणार ‘टेस्ट’
By admin | Updated: January 18, 2015 02:01 IST