प्रशासकीय समितीचा निर्णय : सचखंड गुरुद्वारा साहिबची पवित्र इमारत सोन्याने मढवणारअमरिकसिंघ वासरीकर - नांदेडयेथील सचखंड गुरुद्वारा साहिबची पवित्र इमारत स्वर्णजडीत करण्याच्या निर्णयावर १७ फेब्रुवारी रोजी झालेल्या प्रशासकीय समितीच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आला़ स्वर्णजडीत गुरुद्वारामध्ये अमृतसरनंतर जगात नांदेडचा गुरुद्वारा दुसरा ठरणार आहे़ गुरुद्वारा प्रशासकीय समिती तख्त सचखंड श्री हजूर साहिबची १७ फेब्रुवारी रोजी बैठक झाली़ बैठकीच्या अध्यक्षस्थानी समितीचे अध्यक्ष डॉ़विजय सतबीरसिंघ हे होते़ बैठकीत दरबार साहिबच्या पवित्र इमारतीला स्वर्णजडीत करण्याचा निर्णय सर्व संमतीने घेण्यात आला व त्या कामाची सेवा गुरुद्वारा लंगर साहिबचे जत्थेदार संतबाबा नरिंदरसिंघजी व संतबाबा बलविंदरसिंघजी यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला. गुरु-त्ता-गद्दी त्रिशताब्दी सोहळ्यापासून गुरुद्वारा सचखंडचे स्वर्ण घुमटच्या सोने बदलाची सेवा करण्यात यावी यावर चर्चा सुरु होती़ त्यासाठी देश-विदेशातील भाविकांनी तयारी दर्शविली होती़ आता प्रशासकीय समितीने या निर्णयाला मंजुरी दिली आहे़ यामुळे स्वर्णजडीत असलेला जगात नांदेडचा दुसरा गुरुद्वारा ठरणार आहे़ या बैठकीत राज्याचे माजी गृहमंत्री आर.आर. पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्याचबरोबर गुरुद्वारा सचखंड बोर्डाच्या कायम कर्मचाऱ्यांना पदोन्नती देणे, गुरुद्वारा बोर्डामध्ये कर्मचाऱ्यांना कायम करणे, बोर्डाच्या रिकाम्या जागेवर व्यापारी संकुल बांधणे, दशमेश हॉस्पीटल येथे वातानुकुलित ३०० खोल्यांचे यात्री निवास बांधणे, सांस्कृतिक प्रतिक्षागृह व अत्याधुनिक स्वयंपाकगृह सर्वसुविधायुक्त तयार करण्यासाठी शासनातर्फे अनुदान घेवून मान्य करण्यासाठी प्रस्तावास मान्यता देण्यात आली. याबरोबरच अनेक महत्वाचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले़
नांदेडमध्येही सुवर्ण गुरुद्वारा!
By admin | Updated: February 18, 2015 02:30 IST