कोल्हापूर : अंबाबाई मूर्तीच्या पुनर्प्रतिष्ठापनेला तीनशे वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त दोन वर्षांपूर्वी संकल्प करण्यात आलेली साडेबावीस किलोची सुवर्णपालखी सोमवारी (दि. १ मे) देवीला अर्पण करण्यात येणार असल्याची माहिती श्री करवीरनिवासिनी महालक्ष्मी सुवर्ण पालखी ट्रस्टचे अध्यक्ष खासदार धनंजय महाडिक यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. ही पालखी सुवर्ण कारागीर गणेश चव्हाण यांनी वेदमूर्ती सुहास जोशी यांच्या सूचनेनुसार केली आहे.हा पालखी हस्तांतरण सोहळा भवानी मंडपात सायंकाळी साडेपाच वाजता तमिळनाडू कांचीपुरममधील श्री कांची कामकोटी पीठाचे पीठाधिपती जयेंद्र सरस्वती स्वामी,आंध्र प्रदेश राघवेंद्र स्वामी मठाचे सुबुधेंद्रतीर्थ स्वामी व करवीर पीठाचे विद्यानृसिंह स्वामी या तीन शंकराचार्यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. अध्यक्षस्थानी शाहू छत्रपती महाराज असतील. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते पालखीची कागदपत्रे देवस्थान समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांना सुपूर्द करण्यात येणार आहेत. यावेळी महापौर हसिना फरास यांच्या हस्ते स्मरणिकेचे प्रकाशन होणार आहे.महाडिक म्हणाले, ‘पालखीसाठी १९ हजार भाविकांकडून २६ किलो सोने देणगी स्वरूपात मिळाले आहे. त्यापैकी प्रभावळ, मोर्चेल आणि चवऱ्या यांसाठी जवळपास साडेतीन किलो सोन्याचा वापर करण्यात आला. सुवर्णपालखीसाठी साडेबावीस किलो सोने लागले. पालखीसाठी आठ कोटींचा खर्च आला.’ कार्याध्यक्ष भरत ओसवाल म्हणाले, समाजाच्या सर्वच स्तरांतून भरभरून मदत मिळाली. देवीसाठी शंभर रुपयांचाही आम्ही सन्मानपूर्वक स्वीकार केला. व्यवहारात अत्यंत पारदर्शीपणा जपला आहे. सर्व सोन्याचे हॉलमार्किंग केले आहे.’ यावेळी कार्याध्यक्ष भरत ओसवाल, जितेंद्र पाटील, दिगंबर इंगवले, समीर शेठ, आर. डी. पाटील, के. रामाराव, नंदकुमार मराठेंसह पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी) सुहासिनींची महाआरतीया सोहळ्यानिमित्त भवानी मंडपात मोठे व्यासपीठ उभारण्यात येत आहे. अॅडफाईन जाहिरात संस्थेचे अमरदीप पाटील यांच्याकडून या सोहळ््याचे नियोजन केले जात आहे. दुसरीकडे, अंबाबाई मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात येणार आहे. सजावटीसाठी परदेशी फुलांचाही वापर होणार आहे. अहमदाबाद येथील आकर्षक विद्युत्दीपांनी मंदिर परिसर उजळून निघणार आहे. सोहळ्यादरम्यान पारंपरिक वाद्यांचा गजर होणार आहे. हा सोहळा झाल्यावर रात्री आठ वाजता एक हजार सुवासिनी हातात दीप घेऊन देवीची महाआरती करणार आहेत.अंबाबाईच्या भक्तांमुळे सुवर्णपालखीचा संकल्प अवघ्या दोन वर्षांमध्ये पूर्णत्वास आला आहे. हा दिवस माझ्या आयुष्यातील आनंद आणि अभिमानाचा आहे. सुवर्णपालखीमुळे कोल्हापूरचे पर्यटनही वाढेल, असा विश्वास आहे. - धनंजय महाडिक, खासदार, कोल्हापूर
अंबाबाईला सोमवारी सुवर्णपालखी अर्पण
By admin | Updated: April 29, 2017 01:11 IST