- जयंत धुळप
अलिबाग, दि. 29 - गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे बुजवून तो 30 ऑगस्टपूर्वी वाहतूकीस बिनधोक होण्याच्या सर्व शक्यता धुसर झाल्या असल्याने, या महामार्गावरील वडखळ, वाकण, सुकेळी खिंड, माणगांव आणि नाते खिंड(महाड) येथे दरवर्षी प्रमाणे वाहतूक कोंडी होऊन कोकणात जाणा-या चाकरमानी गणोशभक्तांचे हाल होवू नये याकरिता गोवा महामार्गाच्या या टप्प्याकरीता रायगड जिल्हा पोलीसांनी चार पर्यायी मार्ग उपलब्ध करुन देवून, महामार्गावरील वाहतूकच कमी करण्याचे नियोजन केले असल्याची माहिती रायगड जिल्हा पोलीस अधिक्षक मो.सुवेझ हक यांनी सोमवारी संध्याकाळी पत्रकारांशी बोलताना दिली आहे.
गोवा राष्ट्रीय महामार्ग वाहतूक नियंत्रण विशेष पोलीस बंदोबस्त
गोवा राष्ट्रीय महामार्गावर कोणत्याही परिस्थितीत वाहतूक कोंडी होवू द्यायची नाही या करिता रायगड पोलीसांच्या माध्यमातून प्रभावी बंदोबस्त नियोजन करण्यात आले आहे. 5 पोलीस उप अधिक्षक, 13 पोलीस निरिक्षक, 34 पोलीस उप निरिक्षक अशा एकुण 52 पोलीस अधिका:यांसह 428 पोलीस, 18 पोलीस जिप,20 मोटरसायकलीस्ट पोलीस, 54 वॉकीटॉकी अशी फौज 1 सप्टेंबर पासून 24 तास तैनात करण्यात येणार आहे.
चार पोलीस मदत केंद्रांसह,आपत्कालीन यंत्रणा सज्ज
गोवा राष्ट्रीय महामार्गावर कोणत्याही स्वरुपीची आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्यावर मार्ग तत्काळ काढण्याकरीता गोवा महामार्गाच्या रायगड जिल्ह्याच्या टप्प्यात चार क्रेन, चार जेसीबी, चार रुग्णवाहीका, 55 सीसीटीव्ही कॅमेरे या सह हमरापूर, कांदळेपाडा,वाकण फाटा,नातेखिंड येथे पोलीस मदत केंद्रे उभारण्यात येत आहेत
रायगड जिल्ह्यात 276 सार्वजनिक तर 99 हजार 762 खाजगी गणपती
रायगड जिल्ह्यात 276 सार्वजनिक तर 99 हजार 762 खाजगी गणपती तर 14 हजार 647 गौरींची स्थापना होणार असून गणोशोत्सव कालात जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखण्याकरीता जिल्हा पोलीस अधिक्षक, अप्पर पोलीस अधिक्षक, सात उप विभागीय पोलीस अधिकारी, 27 पोलीस निरिक्षक, 144 पोलीस उप निरिक्षक व 1900 पोलीस तैनात करण्यात आले आहेत. परजिल्ह्यातील 400 पोलीस, 400 होमगार्ड आणि एसआरपीची एक कंपनी रायगड जिल्ह्यास उपलब्ध होणार असल्याचे हक यांनी अखेरीस सांगितले.
गोवा राष्ट्रीय महामागावरुन कोकणात जाण्याकरीता पर्यायी मार्ग
अ.क्र.मुळ मार्ग टप्पा पर्यायी मार्ग
1. खारपाडा ते वडखळ ‘आपटा-रसायनी-दांडफाटा-खालापूर-पाली-वाकण’
वा ‘पाली-रवाळजे-निजामपूर-माणगांव’
2. वडखळ ते नागोठणो वडखळ-पोयनाड-पेझारी-नागोठणो-वाकण-माणगांव
3.वाकणफाटा ते कोलाडकोलाड-रोहा-भिसेखिंड-नागोठणो-पोयनाड-वडखळ.
4.कशेडी घाट कोंडी पर्याय राजेवाडी टोलनाका-शिरगांव-फाळकेवाडी-नातूनगर-खेड