कोल्हापूर : दिल्लीच्या तख्तावर भगवा फडकला, आता बारी महाराष्ट्राची. राज्याची सत्ता द्या, सर्व प्रश्न मार्गी लावतो. येणारे सरकार माङो सरकार आहे, असे तुम्हाला वाटेल इतके चांगले काम करून दाखवितो, असा विश्वास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी व्यक्त केला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर नेते व माजी खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्या हमीदवाडा (ता. कागल) येथील साखर कारखान्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्य़ाचे अनावरण ठाकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी काँग्रेसचे माजी आमदार संजय घाटगे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश आबीटकर व मंडलिक यांचा नातू वीरेंद्र मंडलिक यांनी शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला. याच कार्यक्रमात मंडलिक यांनी संजय घाटगे यांची कागल विधानसभा मतदारसंघातून महायुतीतर्फे उमेदवारी जाहीर केली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला होता.
भावी मुख्यमंत्री..
या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांचा उल्लेख सगळ्य़ांनीच ‘भावी मुख्यमंत्री’ असा केला. स्वत: ठाकरे यांच्याही भाषणाचा सूर त्याच स्वरूपाचा होता. चंदगडचे माजी आमदार नरसिंगराव पाटील हे देखील शिवसेनेत प्रवेश करणार होते परंतु नंतर रद्द झाला.