कोल्हापूर : ‘अच्छे दिन’ येतील म्हणून भुलून आम्ही भाजपवाल्यांच्या मागे गेलो; परंतु प्रत्यक्षात आमच्या वाट्याला कडकडीत ऊनच आले. केंद्रातील व राज्यातील सरकारही बदलले; परंतु पुन्हा आम्हांला शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर येण्याची वेळ या सरकारने आणली. सरकार जर आमच्या प्रश्नांना न्याय देणार नसेल तर ते उलथवून टाकण्याची ताकद चळवळीत आहे, असा सज्जड इशारा भाजपचा मित्रपक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी यांनी गुरुवारी येथे झालेल्या सभेत दिला. कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीतच शेट्टी यांनी केंद्र व राज्य सरकारच्या कारभारावर आसूड ओढला. त्याला शेतकऱ्यांनीही टाळ्यांच्या कडकडाटात प्रतिसाद दिला.राज्य सरकारने शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करावा आणि प्रतिटनास ५०० रुपयांचा दुसरा हप्ता द्यावा; अन्यथा २२ मेपासून पुण्यातून हजारो शेतकरी चालत मुंबईला राजभवनवर धडक देतील आणि आत्मक्लेश आंदोलन करतील, असा कृती कार्यक्रमही शेट्टी यांनी यावेळी जाहीर केला. स्वाभिमानी शेतकरी संघटना युवा आघाडीच्या वतीने २८ एप्रिलपासून जिल्ह्यातील ३५० गावे व १२५० किलोमीटर फिरून आलेल्या मोटारसायकल रॅलीचा समारोप येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील जाहीर सभेने झाला. तत्पूर्वी दसरा चौकातून शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली कर्जमुक्ती मोर्चा काढण्यात आला. रणरणत्या उन्हातही त्यामध्ये शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत या मोर्चास उपस्थित राहणार का याबद्दल मोठी उत्सुकता होती. ते मोर्चात सहभागी झाले नाहीत; परंतु समारोप सभेस उपस्थित राहून राज्यातील सरकारमध्ये शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठीच सहभागी झालो असल्याचे त्यांनी सांगितले. शेट्टी सरकारविरोधात प्रहार करीत असताना त्याच सभेत सदाभाऊंनी मात्र हे सरकार कसे शेतकरी हिताचा कारभार करीत आहे, त्याचे गुणगान गायिले. मी चळवळीच्या बळावरच मंत्री झालो, कुणाच्या मेहरबानीवर नव्हे, असा सूचक इशाराही त्यांनी यावेळी शेट्टी यांना दिला. या सभेस राजस्थान किसान महापंचायतीचे रामपाल जाट, संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रकाश पोकळे, वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तूपकर, जिल्हाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील, भगवान काटे, सावकार मादनाईक, युवा आघाडीचे अजित पोवार व सागर शंभुशेटे, आदी उपस्थित होते. ऊस परिषदेप्रमाणेच या मोर्चालाही कोल्हापूरसह सांगली, सातारा जिल्ह्णांतील शेतकरी उपस्थित होते. सभा सुरु असतानाच शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांना मागण्यांचे निवेदन दिले. ————————राज्यपालच का?आतापर्यंत मंत्रालयाच्या दारात विविध आंदोलने केली. तूर फेकली, कांदे ओतले तरी या सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला वेळ नाही. त्यामुळे बाकीच्या कुणास आम्हांला भेटायला वेळ नसेल तर आता राज्यपाल तरी भेटतात का पाहू, असे शेट्टी यांनी सांगितले.—————————बघावे कुणाकडे?मागचे सरकार वाईट होते म्हणून ते आम्ही बदलले; परंतु ही भानगड अंगलट आली. त्यामुळे आता बघावे कुणाकडे हाच प्रश्न आम्हांला पडला असल्याचे वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तूपकर यांनी सांगितले. हे सांगताना त्यांनी मार्मिक उदाहरण दिले. ते म्हणाले, ‘एका गल्लीतून वारकरी संप्रदायातील नवरा-बायको निघाले होते. रस्त्यात उभे राहून एक मुलगा लघुशंका करीत होता. त्यांना ते आवडले नाही. मुलाला त्याबद्दल रागावल्यावर तो तुम्हांला काय करायचे? असे उलटे बोलला. म्हणून ते दाम्पत्य त्याच्या वडिलांकडे तक्रार करायला गेले. तिथे जाऊन पाहतो तर त्याचे वडील गॅलरीतून लघुशंका करत होते.’मागण्या अशाशेतकऱ्यांचा सातबारा कोरा कराउसाला दुसरा हप्ता ५०० रुपये त्वरित द्याशेती पंपास २४ तास वीज पुरवठा करास्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करामायक्रो फायनान्स कंपन्यांच्या लुटीतून मुक्तता कराआंदोलन असे : २२ मे : महात्मा फुले यांच्या वाड्यात जाऊन फुले यांना अभिवादन करणार. त्यांनी जशी शेतकऱ्यांच्या व्यथा सांगण्यासाठी इंग्लंडच्या राणीची भेट घेतली, तशीच राज्यपालांची भेट पुण्याहून चालत जाऊन घेणार.३० मे : राज्यपालांना हजारो शेतकरी जाऊन साडेसहा लाख शेतकऱ्यांनी भरून दिलेले कर्जमुक्तीचे अर्ज सादर करणार.२२ मे : साखर कारखानदारांनी टनास ५०० रुपयांचा दुसरा हप्ता न दिल्यास कारखान्याच्या गोदामातून साखरेचा कण बाहेर पडू देणार नाही.
शेतकरी कर्जमाफी द्या; अन्यथा सरकार उलथवू
By admin | Updated: May 4, 2017 23:25 IST