ठाणे : आपल्याच जवळच्या नात्यातील तरुणाने लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केल्यानंतर, लग्नास नकार दिल्याने कळव्यातील २६ वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याची घटना सोमवारी घडली. खेतवाडी (जि. रत्नागिरी) येथे राहणाऱ्या नंदकिशोर राणे या तरुणाविरुद्ध कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.खेतवाडीतील नंदकिशोर आणि ठाण्याच्या कळवा भागातील ही तरुणी दोघेही एकमेकांचे जवळचे नातेवाईक आहेत. त्याने लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर कार्ला, लोणावळा येथील एका लॉजवर ३ एप्रिल २०१७ रोजी, तसेच त्यापूर्वी काही वेळा लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर, तिने त्याच्याकडे लग्नासाठी विचारणा केल्यानंतर त्याने लग्नास नकार दिला. आपली शारीरिक आणि मानसिक फसवणूक झाल्यामुळे, तिने ३ एप्रिल रोजी कळव्यातील घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनास्थळी पोलिसांना मिळालेल्या चिठ्ठीद्वारे अत्याचाराची ही घटना उघडकीस आली. त्यानुसार आरोपीला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांचे पथक रत्नागिरीला रवाना झाले असून, त्याला लवकरच ताब्यात घेण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले. (प्रतिनिधी)
लैंगिक अत्याचारप्रकरणी तरुणीची आत्महत्या
By admin | Updated: April 5, 2017 05:42 IST