नरेंद्र जावरे , चिखलदरा (अमरावती)आठवड्यापूर्वी जन्मलेले अस्वलाचे पिल्लू येथून दहा किमी अंतरावरील हरी आमराईनजीक रस्त्यावर सोमवारी सकाळी ११ च्या सुमारास चिखलदऱ्याला जाणाऱ्या प्रवाशांना दिसले. त्यांनी ते ताब्यात घेऊन चिखलदरा वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिले. त्या पिलाची पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासणी करण्यात आली. ते सदृढ असून आता त्याच्या मातेचा शोध घेऊन त्याला लवकरच जंगलात सोडण्यात येणार आहे. चिखलदरा परिक्षेत्रात अस्वलांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. चिखलदरा-धामणगाव गढीमार्गे येणाऱ्या नागरिकांना अस्वलापासून सावध राहण्याच्या सूचना वनविभागाने दिल्या आहेत. पिलाच्या शोधात अस्वल रस्त्यावर येऊन हल्ला करण्याची भीतीसुद्धा व्यक्त करण्यात आली आहे.
अस्वलाच्या पिल्लाला मिळाले जीवदान
By admin | Updated: February 7, 2017 05:09 IST