अतुल मोघे : बाल स्वयंसेवकांचा शस्त्रपूजन सोहळानागपूर : देशाला सुरक्षित ठेवण्यासाठी, शत्रूमध्ये भीती निर्माण करण्यासाठी शक्तीची गरज आहे. तसेच देशाला सशक्त बनविण्यासाठी सृदृढ मानसिकतेची गरज आहे. आजही मांजर आडवी गेल्यावर वाहने थांबतात. मात्र सिग्नलचा लाल लाईट लागला असतानाही, वाहतूक ब्रेक करतात, अशी मानसिकता समाजाची झाली आहे. नियम आणि संयमाने वागल्यास मानसिकता सृदृढ होते. त्यातून संघटित शक्ती निर्माण होते, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विदर्भ प्रांतचे सहकार्यवाह प्रा. अतुल मोघे यांनी व्यक्त केले. विजयादशमीनिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल स्वयंसेवकांचा शस्त्रपुजन सोहळा रेशीमबाग मैदानावर पार पडला. या सोहळ्याला वक्ता म्हणून अतुल मोघे उपस्थित होते. सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी रा.स्व.संघाचे विदर्भ प्रांत सहसंघचालक राम हरकरे व प्रमुख अतिथी म्हणून युनिव्हर्सल हाऊस प्रा. लि. चे प्रवर्तक आशिष कलोडे उपस्थित होते. उपस्थितांच्या हस्ते शस्त्रपूजनाचा सोहळा पार पडला. याप्रसंगी बाल स्वयंसेवकांना मार्गदर्शन करताना आशिष कलोडे म्हणाले की, विद्यार्थीदशेत परीक्षेचा जसा अभ्यासक्रम असतो, तसाच जीवनाच्या परीक्षेत अभ्यासक्रम असतो. तो सोपा, सहज आणि आनंददायी असतो. त्याला नित्य, निरंतर केल्यास जीवनाची परीक्षा सहजतेने यशस्वी होऊ शकता. या अभ्यासक्रमाचा पहिला पेपर आरोग्याचा असतो. आरोग्य टिकविण्यासाठी नियमित व्यायाम, खेळ खेळणे गरजेचे असते. दुसरा पेपर हा वाचनाचा असतो. भरपूर वाचन केल्यास, तुम्ही अनुभवसंपन्न बनता. तिसरा पेपर म्हणजे छंद जोपासणे, छंद जोपासल्यास तुम्ही ताणतणावापासून मुक्त राहता आणि चौथा निरंतर शिकत राहणे. कारण शिकलेले कधीच वाया जात नाही. आयुष्यात कुठल्यातरी रूपाने तुम्हाला त्याची मदत होते. या सोहळ्याला उपस्थित बाल स्वयंसेवकांनी संघात शिकविल्या जाणाऱ्या शारीरिक कवायतीचे सादरीकरण केले. घोषपथकांनी शिस्तबद्ध संचलन सादर केले. सोहळ्याचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन महानगर सहसंघचालक लक्ष्मण पार्डीकर यांनी केले. (प्रतिनिधी)
सृदृढ मानसिकतेतून संघटित शक्तीची निर्मिती
By admin | Updated: September 29, 2014 01:06 IST