मंत्रालयात नोकरीचे आमिष दाखविणारा गजाआड
By admin | Published: October 12, 2016 05:24 AM2016-10-12T05:24:29+5:302016-10-12T05:24:29+5:30
मंत्रालयातील समाज कल्याण विभागात नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून तरूणाला १० लाख रुपयांना गंडा घालणारा अजित बेडगे याने
मुंबई : मंत्रालयातील समाज कल्याण विभागात नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून तरूणाला १० लाख रुपयांना गंडा घालणारा अजित बेडगे याने आतापर्यंत डझनभर तरुणांना अशाप्रकारेच गंडा घातल्याचे उघड झाले आहे. तसेच बडगे याला १ कोटी रुपयांच्या फसवणूकीप्रकरणी पुण्याच्या कोंडवा पोलिसांनी अटक केली होती. सध्या तो जामिनावर सुटला होता, अशीही माहिती समोर आली आहे.
अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेल्या तरूणाची शिक्षणादरम्यान पुण्याच्या हनुमंत धायगुडे याच्यासोबत आळख झाली होती. याच ओळखीतून धायगुडेच्या मदतीने महाठग बेडगे याने याला तरूणाला गाठले. त्याला मंत्रालयातील समाजकल्याण विभागात निरीक्षक पदावर नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवत १० लाख रुपयांची मागणी केली. हा तरूण आमिषाला बळी पडल्याचे लक्षात येताच दोघांनीही त्याला ५ लाख २० हजार रुपये घेऊन ७ आॅगस्ट रोजी मंत्रालय परिसरात बोलावून घेतले. तरूणाला आमदार निवासात नेत, समाज कल्याण विभागातील सचिवांचा शिक्का असलेले खोटे पत्र त्याला दिले. सर्व पैसे देऊनही नोकरी न मिळाल्याने या तरूणाने मरीन ड्राईव्ह पोलीस ठाणे गाठून याची तक्रार दिली.
पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असतानाच समांतर तपास करत असलेल्या गुन्हे शाखेच्या मालमत्ता विरोधी कक्षातील अधिकाऱ्यांनी याचा तपास करत धायगुडे आणि बेडगे यांना पुण्यातून बेड्या ठोकल्या. दोन्ही आरोपींकडे कसून चैकशी सुरू केली आहे. (प्रतिनिधी)