मुंबई : वर्सोवा मेट्रो स्थानकालगतच्या स्वनाक्षय मित्र मंडळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने कागदाच्या लगद्यापासून पर्यावरणस्नेही गणेशमूर्ती साकारण्यात आली आहे, अशी माहिती मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक देवेंद्र आंबेरकर यांनी दिली. १९८१ साली या मंडळाची स्थापना झाली. यंदा हे मंडळ ३६ वा सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करत आहे. मंडळाची गणेशमूर्ती ही पृथ्वीवर उभी असून, झाड तोडणाऱ्या माणसाला ती थांबवत आहे. झाडे कापू नका, पर्यावरणाचे रक्षण करा, असा संदेश येथील देखाव्यातून देण्यात आला आहे. वाहतूककोंडी, प्रदूषण, दहशतवाद, शांतता आणि ढगफुटीसारखे विषय देखाव्यातून साकारण्यात आले आहेत, असे मंडळाचे अध्यक्ष राजेश ढेरे आणि सल्लागार संजीव कल्ले यांनी सांगितले. मंडळाचे शौकत विरानी, विवेक पंगेरकर, श्रवण गायकवाड, अमेय घाग, नासीर अन्सारी, विकी गुप्ता हे कार्यकर्ते गणेशोत्सवासाठी कार्यरत आहेत. दरम्यान, मंडळातर्फे गरीब-गरजू विद्यार्थ्यांना वह्यावाटप, मोफत वैद्यकीय शिबिर, वृक्षारोपण, अपंग मुलांना सायकल आणि व्हीलचेअरचे वाटप, बालदिनानिमित्त स्पर्धांचे आयोजन, असे उपक्रम मंडळातर्फे राबवले जातात, असे मंडळाचे सरचिटणीस अशोक मोरे आणि ढेरे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
कागदाच्या लगद्यापासून साकारली गणेशमूर्ती
By admin | Updated: September 5, 2016 01:55 IST