ऑनलाइन लोकमत -
जनजीवन विस्कळीत : पर्लकोटा नदीच्या पुलावर पाणी
गडचिरोली, दि. 09 - भामरागड तालुक्यातील पर्लकोटा नदी आणि एटापल्ली तालुक्यातील आलदंडी नदीवरील पूल पाण्याखाली आले असून गडअहेरी नाल्याला पूर आल्याने या परिसरातील जवळपास १५० गावांचा संपर्क तुटला आहे. मागील दोन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.
भामरागड शहराच्या अगदी जवळ असलेल्या पर्लकोटा नदीवरील पुलाची उंची कमी आहे. शिवाय ही नदी जंगलातून वाहत असल्याने तिला लवकरच पूर येते. शुक्रवारपासून सुरू असलेल्या पावसामुळे नदीच्या पाण्याची पातळी वाढली. रात्री पर्लकोटा नदीवरील पुलावर पाणी चढले. शनिवारी दुपारच्या सुमारास या पुलावर दोन ते अडीच फूट पाणी होते. त्यामुळे भामरागडसह जवळपास १०० गावांचा संपर्क तुटला आहे.
अहेरीपासून एक किमी अंतरावर असलेल्या गडअहेरी नाल्यावरही अत्यंत कमी उंचीचा पूल आहे. या पुलावर पाणी साचल्याने अहेरी तालुक्यातील देवलमरी, कोत्तागुडम, पुसूकपल्ली, संड्रा, चेरपल्ली, आवलमरी, व्यंकटरावपेठा, इंदाराम, आकनपल्ली, काटेपल्ली, कोलपल्ली, कर्नेली, लंकाचेन, वट्रा, चिन्नावट्रा, पेदावट्रा आदी २० गावांचा संपर्क तुटला आहे. त्याचबरोबर एटापल्ली तालुक्यातील आलदंडी नदी पुलावरून ७ ते ८ फूट पाणी वाहत असल्याने सुरजागड परिसरातील ७० गावांचा संपर्क तुटला आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास आणखी अनेक गावांचा संपर्क तुटण्याची शक्यता अधिकाºयांनी व्यक्त केली आहे.