अतुल जयस्वाल अकोला, दि. ५- राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान, राष्ट्रीय नागरी अभियान व राष्ट्रीय रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत विविध राष्ट्रीय संसर्गजन्य व असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम राबविण्यासाठी आरोग्य विभागात विविध पदांवर कंत्राटी तत्त्वावर कार्यरत असलेल्या राज्यभरातील तब्बल २२ हजार अधिकारी व कर्मचार्यांचे कंत्राट ३१ मार्च २0१७ रोजी संपत आहे. शासकीय सेवेत कायम करून घेण्याच्या मागणीसाठी लढा देत असलेल्या या कर्मचार्यांना यावर्षी अद्यापपर्यंंत मुदतवाढ मिळालेली नसल्याने त्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे.जनतेस सहजसाध्य, परवडण्याजोगी, कार्यक्षम, उत्तरायी आणि सर्व प्रकारच्या आरोग्यसेवा ग्रामीण भागात उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाने संपूर्ण देशात एप्रिल २00५ पासून राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान सुरू केले. दरम्यान, २0१४-१५ मध्ये केंद्र सरकारने सर्व केंद्र पुरस्कृत योजना एकत्रित करून त्यास ह्यराष्ट्रीय आरोग्य अभियानह्ण, असे नाव दिले. या राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आता राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान, राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान व राष्ट्रीय रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत विविध राष्ट्रीय संसर्गजन्य व असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांचा समावेश होतो. या अभियानांतर्गत असलेल्या विविध योजना राबविण्यासाठी आरोग्य विभागातील विविध आस्थापनांमध्ये राज्यभरात तब्बल २२ हजार अधिकारी व कर्मचारी कंत्राटी तत्त्वावर कार्यरत आहेत. इतर शासकीय कर्मचार्यांप्रमाणे काम करावे लागत असतानाही या कर्मचार्यांना मानधन मात्र अत्यंत तुटपुंजे मिळते. ह्यसमान काम - समान वेतनह्ण आणि विनाशर्त शासकीय सेवेत समायोजन या दोन प्रमुख मागण्यांसाठी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी महासंघ ही संघटना २0१२ पासून संघर्ष करीत आहे. परंतु, शासनाकडून अद्यापपर्यंंत त्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत. दरम्यान, एनएचएम अंतर्गत असलेल्या योजना राबविण्यासाठी राज्य शासनाने ३१ मार्च २0१७ पर्यंंत मुदतवाढ दिली आहे. ही मुदत संपण्यासाठी केवळ २५ दिवसांचा अवधी शिल्लक आहे. दरवर्षी साधारणपणे जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात या अभियानास मुदतवाढ दिली जाते. मार्च महिना सुरू झाला असतानाही शासन स्तरावरून अद्यापही या अभियानास मुदतवाढ मिळाली नसल्याने या अभियानांतर्गत कार्यरत असलेल्या कर्मचार्यांमध्ये नोकरीविषयी साशंकता निर्माण झाली आहे.राज्यात २२ हजार कर्मचारीएनएचएम अंतर्गत राज्यात २२ हजार कर्मचारी कंत्राटी तत्त्वावर कार्यरत आहेत. अमरावती विभागात जवळपास १५00 अधिकारी-कर्मचारी एनएचएम अंतर्गत विविध पदांवर काम करीत आहेत.एनएचएम अभियानातील कर्मचारी हे ११ महिन्यांच्या कंत्राटावर कार्यरत असतात. दरवर्षी कंत्राट संपल्यानंतर त्यांना नव्याने मुदतवाढ देण्यात येते. सुरुवातीपासून ही प्रक्रिया अवलंबिण्यात येत आहे. यावर्षीही कंत्राटी कर्मचार्यांना मुदतवाढ देण्यात येईल. - डॉ. नितीन अंबाडेकर उपसंचालक, आरोग्य सेवा, अकोला.एनएचएम अभियानातील कर्मचार्यांना अद्यापपर्यंंत शासन स्तरावरून मुदतवाढीचा कोणताही निर्णय झाला नाही. शासनाने अभियानास मुदतवाढ देतानाच कंत्राटी कर्मचार्यांना सेवेत कायम करावे. - मनोज कडू, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी महासंघ, अकोला
‘एनएचएम’चे भवितव्य टांगणीला!
By admin | Updated: March 6, 2017 02:14 IST