खुनापूर्वी बालिकेवर बलात्कार झाल्याचे निष्पन्नरिसॉर्टवर तुफान दगडफेक; लाठीमारात ७ जण जखमीलोणावळा : येथील हॉटेल कुमार रिसॉर्टच्या टेरेसवर मंगळवारी दुपारी एकला सात वर्षांच्या बालिकेचा मृतदेह लोणावळा आढळला होता़ या बालिकेचा बलात्कार करून खून करण्यात आला असल्याचे वैद्यकीय अहवालात स्पष्ट झाले आहे़ या घटनेच्या निषेधार्थ लोणावळ्यात बुधवारी कडकडीत बंद पाळला़ मूक मोर्चाला हिंसक वळण लागल्याने आंदोलनकर्त्यांनी हॉटेल कुमार रिसॉर्टवर तुफानी दगडफेक करीत तोडफोड केली़ पोलिसांच्या लाठीमारात ७ आंदोलक आणि दगडफेकीत ८ पोलीस जखमी झाले.रविवारी येथील रिसॉर्टमध्ये लग्न समारंभाकरिता इंदापूर, रायगड येथील छगन जैन त्यांच्या ७ वर्षांच्या मुलीसह आले होते़ लग्न व स्वागत समारंभादरम्यान रात्री साडेआठनंतर त्याची मुलगी गायब झाली होती़ मुलीचा मृतदेह हॉटेलच्या टेरेसवर सोलर पॅनेलच्या खाली मंगळवारी आढळला होता़ बुधवारी दुपारी पुण्यातील ससून रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर मुलीचा मृत्यू बलात्कार करून गळा चिरल्याने झाला असल्याचे स्पष्ट झाले़ सकाळी कुमार चौकात हजारोंच्या संख्येंने जमलेल्या जमावाने कुमार हॉटेलच्या व्यवस्थापनाच्या हलगर्जीपणा व आडमुठेपणामुळेच ही घटना घडली असल्याचा आरोप करत हॉटेलवर तुफान दगडफेक केली. हॉटेलच्या दोन इमारतींची तसेच साहित्यांची मोठ्या प्रमाणात तोडफ ोड केली़ मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग एक ते दीड तास अडविण्यात आला़ महिलांनी पोलीस ठाण्यावर मूक मोर्चा काढला़ शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून कुमार चौकाला छावणीचे स्वरुप आले आहे़ अप्पर पोलीस अधीक्षक विजय मगर यांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले़ दरम्यान, रिसॉर्टचे मुख्य व्यवस्थापक मनोहर बुधवारी यांच्या फिर्यादीवरुन २३ आंदोलकांवर दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी जोपर्यंत अटक होऊन त्याच्यावर कडक कारवाई होणार नाही, तोपर्यंत कुमार हॉटेल चालू करू देणार नाही़ तसा प्रयत्न केल्यास पुन्हा तोडफोड करु असा इशारा आंदोलकांनी दिला आहे़आरोपींना तातडीने अटक करत सदर खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा, अशी मागणी शिवसेनेच्या नेत्या डॉ़ नीलम गोऱ्हे यांनी पोलीस अधीक्षक मनोजकुमार लोहिया यांच्याकडे केली आहे़ पिंपरी : आरोपींना त्वरित अटक करावी, अशी मागणी खासदार श्रीरंग बारणे यांनी जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज लोहिया यांच्याकडे केली आहे. या घटनेमुळे सर्वसामान्य जनतेमध्ये चीड निर्माण झाली असून पुणे जिल्ह्यात अवैध धंदे, गुंडगिरी यांचे प्रमाण जास्त झाले आहे. याकडे दुर्लक्ष केले जात आहे, असे दिसून येत आहे. अटक न केल्यास जनआंदोलन, जनतेचा रोष वाढल्यास आणि पुढील काळात काहीही अनुचित प्रकार घडू शकतात. तरी त्यास आपण जबाबदार असाल, असे निवेदनात नमूद केलेले आहे.
लोणावळ्यात मोर्चा हिंसक
By admin | Updated: February 19, 2015 01:23 IST