भिवंडी : कल्याण रोडवर नव्याने बांधण्यात येणाऱ्या दांडेकर कंपनी ते साईबाबामंदिर उड्डाणपुलाचे बांधकाम अखंड होऊन त्या दरम्यान कुठेही मार्गिका काढू नये यासाठी सोमवारी दुपारी कल्याण रोड व्यापारी व रहिवासी संघर्ष समितीच्या वतीने महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला.शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्याच्या हेतूने दांडेकर कंपनी ते साईबाबा मंदिर दरम्यान एमएमआरडीए उड्डाणपूल बांधणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद््घाटनानंतर नियोजित पुलाच्या आराखडा व बांधकामात बदल करण्याचे काही राजकीय नेते व नगरसेवकांनी ठरविले आहे.त्यानुसार बाबला कंपाऊंड व नगीना मस्जिद, आजबीबी येथे मार्गिकेसाठी सध्या पुलाचे बांधकाम बंद केले आहे. एमएमआरडीएच्या मूळ आराखड्यात हे मार्गिका नसल्याने फेरबदल करण्यासाठी महासभेत हा विषय घेण्यात येणार आहे. मार्गिका बांधल्यास या मार्गावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न न सुटता अपघातात वाढ होईल अशी भीती समितीने पालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात व्यक्त केली आहे. आयुक्त डॉ. योगेश म्हसे नसल्याने उपायुक्त विनोद शिंगटे यांनी निवेदन स्वीकारले. (प्रतिनिधी)
अखंड उड्डाणपुलासाठी मोर्चा
By admin | Updated: March 2, 2017 03:27 IST