ठाणे, दि. २३ - अहमदनगर जिल्हयातील कोपर्डी येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर मुलींना शाळेतून घरापर्यंत ने आण करण्यासाठी सीसीटीव्हींनी सुसज्ज अशा चार बसेसचं लोकार्पण जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि राष्ट्रीय संत भय्यूजी महाराज यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आलं. मुली आणि पालकांच्या मनातील भीती नाहीशी करुन त्यांना दिलासा देण्यासाठी भय्यूजी महाराज यांनी यावर कायमस्वरुपी सकारात्मक तोडगा काढण्याचे आवाहन केले. त्याला स्वत: पुढाकार घेऊन सर्वोदय या त्यांच्या संस्थेमार्फत २२ लाख रुपये खर्चातून कोपर्डी भागात दोन आणि बीड जिल्हयात दोन अशा चार बसेस दिल्या आहेत. शालेय मुलींना या बसद्वारे घर ते शाळा आणि परतीचा प्रवास नि:शुल्क केला जाणार असल्याची माहिती सूर्योदय संस्थेच्या प्रशाशकीय अधिकारी तथा सुप्रसिद्ध पार्श्वगायिका अनुराधा पौडवाल आणि पालघर जिल्हा शिवसेना संपर्कप्रमुख उपनेते अनंत तरे यांनी ठाण्यात दिली. अशा घटना रोखण्यासाठी जसा कडक कायदा गरजेचा आहे, तसा सामाजिक बदल आणि संस्कार रुजविण्याची गरज आहे. त्यासाठी सूर्योदय परिवार राज्यातील शाळांमध्ये संस्कारवान विद्यार्थी निर्माण करण्यासाठी संस्कार अभियान राबविणार असल्याचीही माहिती त्यांनी यावेळी दिली. कोपर्डी घटनेतील निर्भयाची आई या व्यवस्था समितीची अध्यक्ष असून बसमध्ये सीसीटीव्हीसह , व्हीडीओ रेकॉर्डर, लोकेशन ट्रेकर, गाडी निघतांना आणि पोहचतांना पालकांना सूचित करणारी संदेश यंत्रणाही समाविष्ट केली आहे. या योजनेचे व्यवस्थापन स्थानिक ग्रामस्थांकडे सोपविण्यात आलं असून योजनेचा संपूर्ण खर्च सूर्योदय या संस्थेमार्फत केला जाणार आहे. समाजात अशा प्रकारच्या घटना घडू नये म्हणून राज्यातील प्रत्येक जिल्हयात सूर्योदय संस्कार अभियानाचा प्रारंभ केला जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. अशा घटनांपासून घाबरुन न जाता मुलींना मानसिक बळ मिळावं यासाठी सूर्योदय कुहू कन्याधन सुरक्षा योजनेंतर्गत मोफत बससेवेचा उपक्रम राबविण्यात आला आहे. * कोपर्डीच्या घटनेनंतर आसपासच्या ३३ हजार मुली शाळेत जाण्यास धजावत नव्हत्या. तर पिडीत मुलीची बहिणही यंदा बारावीत असूनही तिलाही शाळेत पाठविण्यास आईने साशंकता व्यक्त केली होती. या सर्व पार्श्वभूमीवर केवळ आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा येथील मुलींना सुविधा आणि सुरक्षा देण्याच्या दृष्टीनं हा उपक्रम सुरु केल्याचं अनुराधा पौडवाल यांनी सांगितलं.
कोपर्डीतील विद्यार्थिनींना मोफत बस सुविधा
By admin | Updated: July 23, 2016 11:08 IST