मुंबई : काळबादेवी येथील गोकूळ निवास या इमारतीला लागलेली भीषण आग विझवताना मृत्युमुखी पडलेल्या अग्निशमन दलाच्या चार वरिष्ठ अधिकाऱ्यांना शहीद घोषित करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली आहे. या अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक मिळण्याकरिता केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवण्याची तयारी फडणवीस यांनी दर्शविली आहे.शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र लिहून या अग्निशमन अधिकाऱ्यांना शहीद घोषित करण्याची मागणी केली होती. प्रमुख अग्निशमन अधिकारी सुनील नेसरीकर, उपप्रमुख अग्निशमन अधिकारी एस. जी. अमिन, साहाय्यक विभागीय अग्निशमन अधिकारी संजय राणे, केंद्र अधिकारी मधुसूदन देसाई यांना शहीद घोषित करण्यात आले आहे. या चारही अधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्र्यांच्या कोट्यातून घरे दिली जाणार आहेत. या अधिकाऱ्यांच्या पाल्याचा शैक्षणिक खर्च महापालिका करणार असून त्यांना नोकरी दिली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दिली. (विशेष प्रतिनिधी)
अग्निशमन दलाचे चार अधिकारी शहीद घोषित
By admin | Updated: June 3, 2015 03:37 IST