ऑनलाइन लोकमत
सटाणा (नाशिक), दि. १० - भाजपने काही वर्षांपूर्वी आमच्या मंत्र्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपावरुन विधीमंडळात गोंधळ घालून सभागृहाचे कामकाज बंद पाडले. मात्र त्यावेळी भाजपसाठी जे भ्रष्टाचारी होते ते आता संत झालेत असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लगावला आहे.
नाशिक जिल्ह्यातील सटाणा येथे शुक्रवारी दुपारी शरद पवार यांनी सभा घेतली. या सभेत बबनराव पाचपुते यांच्या भाजपप्रवेशावर पवारांनी टीका केली. भ्रष्टाचाराच्या आरोपावरुन विरोधकांनी आमच्या दोन मंत्र्याना राजीनामा द्यायला भाग पाडले. आता याच मंडळींना भाजपमध्ये प्रवेश दिला जातो याकडे त्यांनी लक्ष वेधले. शरद पवार संरक्षणमंत्री असताना सीमारेषेवर कधी गेले होते का असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विचारला होता. यावरही शरद पवारांनी प्रत्युत्तर दिले. मी संरक्षणमंत्री असताना सीमारेषेवर गेले होतो असे स्पष्ट करतानाच आता देशाला पूर्णवेळ संरक्षणमंत्री नाही अशी टीकाही त्यांनी केली.