मुंबई : महापालिकेला हादरविणाऱ्या रस्ते आणि नालेसफाई घोटाळ्यात दोषी ठरलेले दक्षता विभागाचे प्रमुख अभियंता उदय मुरूडकर यांना अखेर सक्तीची सेवानिवृत्ती घेण्यास भाग पाडण्यात येणार आहे. तसा प्रस्ताव स्थायी समितीच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. विशेष म्हणजे मुरूडकर यांच्या निवृत्तीसाठी तीन वर्षे शिल्लक आहेत. नालेसफाईच्या कामात दीडशे कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे उघडकीस आल्यानंतर दक्षता विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आली. त्यानंतर उजेडात आलेल्या रस्ते घोटाळ्यातही मुरूडकर यांच्यावर ठपका ठेवण्यात आला. पोलिसांनी त्यांना अटक केली होती. १९ सप्टेंबर २०१५ पासून त्यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. जानेवारी २०१७ मध्ये मुरूडकर यांनी वयाची ५५ वर्षे पूर्ण केली आहेत. निवृत्तीसाठी त्यांची तीन वर्षे अजूनही शिल्लक आहेत. नियमानुसार वयाच्या ५५व्या वर्षानंतर पालिका एखाद्या कर्मचाऱ्याला निवृत्त करू शकते. त्याच धर्तीवर मुरूडकर यांना सक्तीने निवृत्त करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यासंदर्भातील प्रस्ताव स्थायी समितीच्या मंजुरीसाठी पाठविला आहे. त्यानंतर तीन महिन्यांची नोटीस देऊन त्यांना निवृत्त करण्यात येणार असल्याचे समजते. (प्रतिनिधी)
‘त्या’ दोषी अधिकाऱ्याला सक्तीची निवृत्ती
By admin | Updated: April 25, 2017 03:02 IST