मुंबई : वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाने तरुण पिढीला प्रोत्साहन देत सामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण झाले असून बुधवारी खेरवाडी विभागात झालेल्या पदयात्रेत स्थानिक नागरिकांनी पुष्पवृष्टी करून उमेदवार संजीव बागडी यांचे स्वागत केले.वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघ आजही विकासाच्या दृष्टिकोनातून मागासलेला आहे. जनतेला बदल हवा असल्याचे बागडी यांनी पदयात्रेत बोलताना सांगितले. प्रिया दत्त खासदार असताना त्यांच्या निधीतून जनतेची भरीव कामे करण्याचा अनुभव असलेल्या संजीव बागडी यांच्या उमेदवारीमुळे सामान्य कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला असून जनता नवीन नेतृत्वाच्या प्रतीक्षेत असल्याने पदयात्रेत संजीव बागडी यांना जनतेकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले.माजी खासदार प्रिया दत्त याही संजीव बागडी यांच्या प्रचारासाठी परिश्रम घेत आहेत. काँग्रेस आणि पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार संजीव बागडी यांची लढत विद्यमान आमदार प्रकाश सावंत यांच्याशी असून आतापर्यंत झालेल्या प्रचारात संजीव बागडी यांनी लक्षणीय आघाडी घेतली आहे. मतदाराशी प्रत्यक्ष संपर्कावर संजीव बागडी यांचा भर असून अपेक्षेप्रमाणे जनतेचे सहकार्य मिळत आहे. (प्रतिनिधी)
वांद्रे पूर्व येथे उमेदवारावर पुष्पवृष्टी
By admin | Updated: October 9, 2014 04:15 IST