ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 18 - मुंबई महानगरपालिकेची निवडणूक नेहमी कुठल्या-नू-कुठल्या कारणांमुळे लक्षात राहिल अशीच असते. यंदाच्या निवडणुकांमध्ये गेल्या 25 वर्षांपासून शिवसेना-भाजपामध्ये असलेली युती तुटली आहे. दोन्ही पक्षांनी स्वबळाचा नारा देत आपली स्वतंत्र ताकद आजमवायची ठरवली आहे.
मुंबई, ठाणे आणि पुण्यासहीत 10 महापालिकांसाठी 21 फेब्रुवारी मतदान होणार आहे. तर पहिल्या टप्प्यात 15 जिल्हा परिषदा आणि 165 पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी गुरुवारी मतदानाची प्रक्रिया पार पडली. निवडणुकांचे निकाल 23 फेब्रुवारी रोजी लागणार आहेत.
निवडणुकांमध्ये शिवसेना, भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, एमआयएम, समाजवादी पक्षातील उमेदवारांमध्ये 'काँटे की टक्कर' पाहायला मिळत आहे. दरम्यान, मनपा निवडणुकीत पाच असे अनोखे उमेदवार आहेत ज्यांची मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे.
जयंत दांडेकर उर्फ दादा (मनसे)
जयंत दांडेकर हे ‘मूर्ती लहान पण किर्ती महान’ सार्थ ठरवणारे आहेत. आपल्या उंचीचा कोणताही न्यूनगंड मनात न बाळगता सार्वजनिक जीवनात यशस्वी वाटचाल करणाऱ्या दांडेकर हे मुंबईतील विक्रोळीच्या कन्नमवार नगरमधून मनसेचे उमेदवार आहेत. दांडेकर 53 वर्षांचे असून त्यांची उंची तीन फूट एवढी आहे. आपल्या वॉर्डमध्ये त्यांनी गटारे आणि वैद्यकीय समस्या सोडवण्याचे आश्वासन त्यांनी मतदारांना दिले आहे.
पराग शाह (भाजपा)
भारतीय जनता पार्टीने घाटकोपर पूर्वच्या प्रभाग क्र. 132 मधून पराग शाह यांना उमेदवारी दिली आहे. महाराष्ट्राच्या इतिहासातील पराग सर्वात श्रीमंत उमेदवार असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 690 कोटींपेक्षाही अधिक संपत्तीचे ते मालक आहेत. त्यांनी स्वतः निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात ही माहिती दिली आहे. पराग हे बांधकाम व्यावसायिक आहेत.
प्रिया पाटील (अपक्ष)
प्रिया पाटील ही एकमेव तृतीयपंथी उमेदवार कुर्ल्यातील वॉर्ड क्रमांक 166 मधून अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहे. प्रिया एक स्वयंसेवी संस्था चालवते, ही संस्था तृतीय पंथियांचे अधिकार आणि आरोग्यसंबंधीत मुद्यांवर काम करते. जनतेला संधी देण्याचे आवाहन केले असून पुरुष आणि महिलांपेक्षा चांगले प्रतिनिधीत्व करू शकते, असा दावा तिने केला आहे.
विनोद अरगिले (मनसे)
जन्मत:च 80 टक्के अंधत्व असलेले विनोद अरगिले यांना मनसेने तिकीट दिले आहे. गेली पंधरा वर्षे सक्रिय असलेल्या अरगिलेंच्या निवडणुकीकडे अवघ्या मुंबईचे लक्ष लागले आहे. आजवर निवडून आलेल्या अनेक डोळस नगरसेवकांना कामाठीपुऱ्यातील समस्या दिसल्या नाहीत. पण मला त्या समस्या जाणावतात आणि मी त्या नक्कीच सोडवू शकतो, असे वॉर्ड क्रमांक 213 येथेून आपले नशीब आजमावत असलेल्या विनोद अरगिले यांनी सांगितले.
मयुर मौर्य (अपक्ष)
मयुर मौर्य हे खंबाटा एव्हिएशनचे माजी कर्मचारी आहेत. पश्चिम उपनगरमधील वॉर्ड क्रमांक 77 अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. निवडणुकीचा खर्च मौर्य यांनी स्थानिकांकडून मदत स्वरुपात जमवला आहे, ही बाब मौर्य यांच्या प्रचाराचे वैशिष्ट्य आहे.