नागपूर : राज्यात सर्वात सुरक्षित मानल्या जाणाऱ्या येथील मध्यवर्ती कारागृहातून पाच खतरनाक कैद्यांनी पलायन केल्याचे मंगळवारी सकाळी सहा वाजताच्या सुमारास उघडकीस आले़ बराकीवरील खिडकीचे लोखंडी गज कापून ते पळून गेल्याने कारागृहाच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यांना पकडण्यास सर्वत्र नाकाबंदी करण्यात आली. ठिकठिकाणी पोलीस पथके रवाना करण्यात आली, मात्र रात्री उशिरापर्यंत एकालाही पकडण्यात आले नव्हते़ दरम्यान, तुरुंग अधीक्षक वैभव कांबळे यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत केली. बिशनसिंग रम्मूलाल उके (रा. धुमाळ, जि. शिवनी मध्य प्रदेश), शिबू ऊर्फ मोहंमद शोएब सलीम खान (वय २४, रा. मानकापूर), सत्येंद्र ऊर्फ राहुल राजबहादूर गुप्ता (२५, रा. कामठी, नागपूर), प्रेम ऊर्फ नेपाली शालीकराम खत्री (२४, रा. नेपाळ) आणि गोलू ऊर्फ आकाश रज्जूसिंग ठाकूर (२३, रा. नागपूर) अशी फरार कैद्यांची नावे आहेत़ बिशनसिंग, शिब्बू आणि सत्येंद्र या तिघांविरुद्ध मोकाअंतर्गत कारवाई करण्यात आली असून, नेपाली हा हत्यार कायद्यांतर्गत कारागृहात बंद होता. गोलू ठाकूर हा काही दिवसांपूर्वीच पकडला गेला होता. हे पाचही कैदी कारागृहाच्या बराक क्रमांक ६ मध्ये १५४ कैद्यांसोबत बंदिस्त होते. या पाचही जणांनी मंगळवारी पहाटे २ ते ४ च्या दरम्यान बराकीच्या वर असलेल्या खिडकीचा लोखंडी गज कापून बाहेर आले़ त्यानंतर बराकीभोवती असलेली सुमारे १२ फूट आणि त्यानंतर २३ फूट उंच असलेली भिंत चढून हे सर्व कैदी फरार झाले़ (प्रतिनिधी)> वरिष्ठांचे दुर्लक्षच !मध्यवर्ती कारागृहात अनेक वर्षांपासून मोबाइलचा वापर केला जात असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केले होते़ मात्र कारागृह प्रशासनाच्या मुंबई, पुण्यातील वरिष्ठांनी त्याची गंभीर दखल न घेतल्यानेच मंगळवारची ही घटना घडल्याचे सिद्ध झाले़
पाच कैदी पळाले!
By admin | Updated: April 1, 2015 04:26 IST