विरार : गेल्या दोन दिवसांत विरार आणि नालासोपारा परिसरातून पाच अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याच्या तक्रारी विविध पोलीस ठाण्यांत दाखल करण्यात आल्या आहेत. यातील चार मुली नालासोपारा शहरातून गायब झाल्या आहेत. नालासोपारा पूर्वेकडील कृष्णा कॉलनीमधील रितिका सोलंकी (१६)घरातून बुधवारी दुपारी अडीचच्या सुमारास बेपत्ता झाली आहे. त्याच वेळी तुळिंज पोलीस ठाण्याजवळ राहणाऱ्या रोहिणी श्रीमानी यांच्या भावाची मुलगी नम्रता मिलिंद केदारे (१६) आपल्या घरातून रहस्यमय पद्धतीने गायब झाली आहे. येथून जवळच राहणारी नयना धर्मवीर सिंह (१६) ही मुलगी गुरुवारी सकाळी नऊ वाजता शिर्डीनगर येथे शिकवणीला जाते, असे सांगून गेली होती. ती परत परतलीच नाही. तिचा खूप शोध घेण्यात आला. या तीनही घटनांबाबत तुळिंज पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.चौथी घटना नालासोपारा पूर्वेकडील धानीवबाग शिवमंदिर जवळ घडली आहे. काजल यादव (१३) ही मुलगी गुरुवारी दुपारी १२ वाजता शाळेत गेली, ती घरी आलीच नाही. तिचा शोध घेतल्यानंतर वालीव पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीने तिला पळवून नेल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. पाचवी घटना विरार पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. चंदनसार येथील जगजित शैरोसिंह कौर (१६) गुरुवारी दुपारी २ च्या सुमारास घरातून गायब झाली आहे. (वार्ताहर)
वसईतून पाच अल्पवयीन मुली बेपत्ता
By admin | Updated: January 7, 2017 05:42 IST