अमरावती/यवतमाळ/भंडारा : गणपती विसर्जनासाठी गेलेल्या अमरावती जिल्ह्यातील नेरपिंपळाई नजीकच्या घोडगव्हाण येथे दोन मुले शेततळ्यात, मोर्शी तालुक्यात सालबर्डी येथे माडू नदीत एक युवक व आसेगावपूर्णा येथील वीज कर्मचारी नदीत, भंडारा जिल्ह्यात पवनी तालुक्यात वलनी (चौ.) येथे वैनगंगा नदीपात्रात दोन विद्यार्थी आणि यवतमाळ जिल्ह्यात उमरखेडलगतच्या मार्लेगाव येथे एका मुलाचा पैनगंगा नदीच्या पात्रात अशा सहा जणांचा बुडून मृत्यू झाल्याच्या घटना रविवारी घडल्या. त्यामुळे विसर्जनादरम्यान, गावांवर शोककळा पसरली.अमरावती जिल्ह्यात घोडगव्हाण येथील विवेक दीपक खांडेकर व गौरव रमेश खंडारे हे दोघेही रविवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास गावाबाहेरील शेततळ्यात गणपती विसर्जनासाठी गेले होते. विवेक खांडेकर हा सावरखेड येथील साफल्य विद्यालयात इयत्ता आठवीत तर गौरव खंडारे हा मंगरुळ भिलापूर येथील नवलाजी बाबा विद्यालयाचा इयत्ता दहावीचा विद्यार्थी होता. अमरावती येथील पठाण चौक भागातील तारखेड परिसरातील रहिवासी अ. सलीम अ. बारी (२२) रविवारी दुपारी मोर्शीनजीकच्या श्रीक्षेत्र सालबर्डी येथील माडू नदीत विसर्जन करण्यासाठी गेला होता. जिल्ह्यातीलच आसेगावपूर्णा येथे घरगुती गणपतीचे विसर्जन करतेवेळी वीज कर्मचारी कृपेश भारत वाटाणे (३०) यांचा रविवारी सकाळी पाय घसरून नदीतील पाण्यात पडल्याने मृत्यू झाला. रविवारी सकाळी ते कुटुंबीयांसह आसेगावपूर्णा येथील नदीत गणपती विसर्जनाकरिता गेले होते. मात्र, त्यांचा पाय घसरून ते नदीपात्रात पडले व त्यांचा मृत्यू झाला. काही वेळापर्यंत ते पाण्याच्या बाहेर न आल्यावर गावकऱ्यांनी पाण्यात उडी घेऊन त्याला बाहेर काढले. मात्र, तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. भंडारा जिल्ह्यात पवनी तालुक्यातील वलनी (चौ.) येथे गौरव संदीप मेश्राम (११) व समीर मनोज जनबंधू (१४) या दोन विद्यार्थ्यांचा वैनगंगा नदीमध्ये गणपती विसर्जनादरम्यान रविवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास मृत्यू झाला. दरम्यान रविवारी विसर्जन असल्याने बालकांनीच वाजतगाजत मिरवणूक काढली. विसर्जनानंतर सर्व सवंगडी पाण्याबाहेर आले. याचवेळी गौरव आणि समीर पुन्हा नदीपात्रात उतरले. ऐनवेळी पाण्याचा जोरदार प्रवाह आल्याने दोघेही बुडाले. त्यांचे मित्र घाबरून गावात परतले. घटनेमुळे भयभीत होऊन त्यांनी या घटनेची कुणालाही माहिती दिली नाही. दरम्यान गौरव आणि समीरच्या पालकांनी दोघांबाबत विचारणा केल्यांनतर घडलेला प्रसंग बालकांनी सांगितला. गौरव व समीर हे वलनी येथील गांधी विद्यालयाचे विद्यार्थी होते.उमरखेड तालुक्यातील चातारी येथील रहिवासी असलेला माने परिवार मुलाच्या शिक्षणासाठी शहरातील दयानंदनगरात वास्तव्यास आहे. दयानंदनगरातील गणेश उत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीसोबत अभय साहेबराव माने (१६) दुपारी १.३० वाजताच्या सुमारास मार्लेगाव येथील पैनगंगा नदी तीरावर गेला होता. तो पाण्यात उतरला. त्यावेळी त्याचे वडील साहेबराव माने नदीच्या तीरावर लहान मुलासोबत उभे होते. काही वेळातच अभय पाण्यात बुडाला. ही बाब वडिलांच्या लक्षात आली. आरडाओरडा केल्यानंतर उपस्थितांनी त्याला तत्काळ बाहेर काढले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. अभय हा राष्ट्रसंत गोरोबा विद्यालयात दहावीचा विद्यार्थी होता. राज्य विज्ञान प्रदर्शनात त्याच्या प्रयोगाला पुरस्कारही मिळाला होता. अत्यंत हुशार आणि चुणचुणीत अभयच्या मृत्यूची वार्ता पसरताच उमरखेड आणि चातारी येथे शोककळा पसरली. चातारी तर चुलीही पेटल्या नाहीत. (लोकमत न्यूज नेटवर्क)
पाच बालके, दोन तरुणांचा बुडून मृत्यू
By admin | Updated: September 28, 2015 02:45 IST