ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २७ - शेजारच्या राज्यातील मुख्यमंत्री मुंबईत येऊन उद्योजकांना फितवीत असून राज्यातील गुंतवणूक शेजारच्या राज्यात जात आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आधी परराज्यात जाणारी स्वदेश गुंतवणूक रोखावी व मग विदेशी गुंतवणूकीकडे वळावे असा चिमटा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काढला आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून पुन्हा एकदा फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कणखर भूमिका घेतली नाही तर शेजारील राज्य मुंबईसह महाराष्ट्राच्या चेह-यावरील 'मेकअप'ही खरवडून नेतील व राज्याचा चेहरा भेसूर होईल असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. काँग्रेस - राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारचे उच्चाटन करण्यासाठी शिवसेनेनेही जीवाचे रान केले होते, पण कर्तव्यतत्परतेपेक्षा काही ठिकाणची जनता वरवरच्या मेकअपला भुलली. शिवसेना चेह-यावर मुखवटे व मेकअपचे पुढे कधीच चढवत नाही असेही त्यांनी नमूद केले. राज्यात शिवसेनेचा आवाज बुलंद होता व राहणार, ५ - १० आमदार वाढले अथवा घटले म्हणून आमच्या ताकदीच्या बेडकुळ्या कधीच फुगत नाही असा टोलाही त्यांनी भाजपाला लगावला आहे. कोकणातील रोजगार, शेती व लोकांच्या जीवनात विध्वंस घडवणा-या जैतापूर प्रकल्पाला विरोध करणे हेदेखील राष्ट्रहिताचेच काम आहे असे सांगत उद्धव ठाकरेंनी जैतापूर विरोध कायम राहणार असल्याचे स्पष्ट केले.