First Sleeper Vande Bharat In Maharashtra: वंदे भारत ट्रेनची क्रेझ अद्यापही भारतीय प्रवाशांमध्ये कायम आहे. वंदे भारत ट्रेनची सेवा देशभरात सुरू आहे. प्रवाशांकडून वंदे भारत ट्रेनला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. वंदे भारत ट्रेनच्या निर्मितीने भारतीय रेल्वेने एक नव्या अध्यायाला सुरुवात केली आहे. प्रवाशांचे हित लक्षात घेता भारतीय रेल्वेने वंदे भारत ट्रेनची वैविध्यपूर्ण प्रकार आणले. यामध्ये अमृत भारत ट्रेन, वंदे भारत मेट्रो यांचा समावेश आहे. आता वंदे भारत ट्रेनचा आणखी एक प्रकार लवकरच भारतीय प्रवाशांचा सेवेत असणार आहे, तो म्हणजे वंदे भारत स्लीपर ट्रेन. पहिली झलक समोर आणल्यानंतर वंदे भारत स्लीपर ट्रेनच्या चाचण्यांना सुरुवात झाली आहे. लवकरच पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन मार्गस्थ होणार असल्याचे सांगितले जात आहे.
महाराष्ट्रात कोणत्या मार्गावर पहिली वंदे भारत ट्रेन चालवली जाईल, याबाबत रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सूतोवाच केले आहे. यासंदर्भात एक प्रस्ताव मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळाने रेल्वे बोर्डकडे सादर केल्याची माहिती नागपूरचे नवे नियुक्त डी. आर. एम विनायक गर्ग यांनी दिली आहे. डी. आर. एम विनायक गर्ग यांनी पदभार स्वीकारल्यानंतर ते मीडियाशी बोलत होते. गेल्या वर्षांपासून नागपूर ते मुंबई व नागपूर ते पुणे या दोन्ही मार्गावर नवीन गाड्या सुरू करण्याची मागणी प्रवाश्यांकडून करण्यात येत होती. त्या अनुषंगाने मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळाने रेल्वे बोर्डाच्या या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.
पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन महाराष्ट्रात ‘या’ मार्गांवर धावणार
केवळ नागपूर नाही, तर अन्य मंडळांकडूनही स्लीपर वंदे भारत चालवण्याबाबत प्रस्ताव देण्यात आले आहेत. मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळाने नागपूर-मुंबई आणि नागपूर-पुणे या मार्गांवर वंदे भारत ट्रेन चालवण्याचा प्रस्ताव दिला आहे. रेल्वे बोर्ड याचा निर्णय घेईल. परंतु, आमची इच्छा तीच असेल की, या प्रस्तावावर विचार व्हावा. स्लीपर वंदे भारत ट्रेनच्या निर्मितीचे काम वेगाने सुरू असून, जशी ट्रेन उपलब्ध होईल, त्या प्रमाणे रेल्वे बोर्ड निर्णय घेईल. प्रत्येकाला स्लीपर वंदे भारत आपल्याकडे यायला हवी, अशी इच्छा आहे, असे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, सध्या नागपूर येथून नागपूर-सिकंदराबाद आणि नागपूर-इंदूर, अशा वंदे भारत एक्सप्रेस धावत आहेत. त्यात नव्या दोन वंदे भारत एक्सप्रेसची भर पडणार आहे. तसेच काही दिवसांपूर्वी रेल्वे मंडळाने पुणे शहरातून चार नवीन वंदे भारत एक्स्प्रेस सुरु करण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यात पुणे-शेगाव, पुणे-वडोदरा, पुणे-सिकंदराबाद आणि पुणे-बेळगावचा समावेश होता.