मुंबई : उद्योगमंत्री व विधानसभेतील शिवसेनेचे गटनेते सुभाष देसाई हे त्यांना विधानसभेत बसण्याकरिता पहिली रांग दिली जात नसल्याने घुश्शात आहेत तर विधान परिषदेत ज्येष्ठतेनुसार पहिल्या रांगेत बसणाऱ्या शेकापच्या जयंत पाटील यांचे आसन बदलून त्यांना दुसऱ्या रांगेतील आसनावर बसण्यास सांगण्यात आल्याने पाटील नाराज झाले. देसाई यांच्याकरिता पहिल्या बाकावर जागा करण्याची खटपट सुरू असून, जयंत पाटील यांचे आसन कसे बदलले याचा शोध सुरू झाला आहे.सुभाष देसाई हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे विश्वासू सहकारी असल्याने गोरेगाव मतदारसंघातून पराभूत होऊनही देसाई यांचा राज्य मंत्रिमंडळात समावेश केला गेला. त्यांच्याकडे विधानसभेतील गटनेतेपद सोपवले गेले. मात्र देसाई हे मागील युती सरकारच्या काळातही मंत्री नव्हते. त्यामुळे त्या वेळी मंत्रिपदावर राहिलेल्या दिवाकर रावते व रामदास कदम यांना आता पुन्हा मंत्री झाल्याने विधानसभेत पहिल्या बाकावर बसण्याची जागा ज्येष्ठतेनुसार दिलेली असताना देसाई यांना दुसऱ्या क्रमांकाच्या रांगेत बसण्याची व्यवस्था केली गेली. ही बाब देसाई यांना सलत असल्याने त्यांनी आपली पहिल्या रांगेत बसण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी केली.दरम्यान, शेकापचे जयंत पाटील यांना मंगळवारी अचानक दुसऱ्या रांगेत बसण्यास सांगितले. पाटील यांच्या आसनावर काँग्रेसचे संजय दत्त हे माणिकराव ठाकरे यांच्याबरोबर बसले होते. पाटील यांनी औचित्याच्या मुद्द्याद्वारे ही बाब विधान परिषदेत उपस्थित केली. या सभागृहातील चार ज्येष्ठ सदस्यांपैकी आपण एक असून, बी. टी. देशमुख यांच्या निधनानंतर आपली पहिल्या रांगेत बसण्याची व्यवस्था केली होती. कपिल पाटील म्हणाले की, जयंत पाटील यांना अशा प्रकारे अपमानित करून त्यांचे आसन अतिक्रमित करणे योग्य नाही. (विशेष प्रतिनिधी)
पहिल्या रांगेवरून सुभाष देसाई, जयंत पाटील घुश्शात
By admin | Updated: March 11, 2015 01:47 IST