मुंबई : डी.एन.नगर येथील मनिष नगरमध्ये गुरूवारी सायंकाळी सातच्या सुमारास झालेल्या गोळीबारात एकाचा मृत्यूृ झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. धैर्यशील देसाई असे मृत व्यक्तीचे नाव असून संदिप कावा हा इसम या प्रकरणात गंभीर जखमी झाला आहे. संदिपवर लिलावती रूग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती डी.एन.नगर पोलिसांनी दिली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, देसाई व त्यांचे तीन मित्र एका कामानिमित्त त्यांच्याच घरी जमले असताना वाद झाला. टोकाला गेलेल्या वादात त्यांच्या दोन मित्रांनी देसाई व संदिपवर गुप्तीने वार केले. यावेळी गोळीबारही झाल्याचे पोलिसांनी सांगितले. तरी देसांई यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याबाबत पोलीस अधिक तपास करत आहे. शिवाय संदिप याला घटनेनंतर तातडीने नजीकच्या कूपर रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्याची प्रकृती अधिक गंभीर झाल्यानंतर पुढील उपचारासाठी त्याला लिलावती रूग्णालयात हलवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. तरी याप्रकरणी दोन्ही आरोपी फरार असून पोलीस अधिक तपास करत आहे. (प्रतिनिधी)
अंधेरीत गोळीबार; एकाचा मृत्यू
By admin | Updated: October 24, 2014 04:13 IST