ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि, ५ - राज्यभरातील गुंतवणूकदारांना तिप्पट व्याजाचे अमिष दाखवून कोट्यवधींचा गंडा घालणा-या संशयित भाऊसाहेब चव्हाणचे मुंबई-आग्रा महामार्गावरील जत्रा हॉटेलशेजारी असलेल्या केबीसी कंपनीच्या कुलपबंद कार्यालयास सोमवारी सायंकाळी अचानक आग लागली.
या आगमीमध्ये कार्यालयातील टेल जळून खाक झाले असून अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतल्याने पुढील अनर्थ टळला आहे़ दरम्यान, अनेक दिवसांपासून बंद असलेल्या कार्यालयात आग लागली की लावली अश प्रकारच्या चर्चेला उधाण आले होते.
केबीसी फसवणूकप्रकरणी कंपनीचा संचालक भाऊसाहेब चव्हाण, आरती चव्हाण यांच्यासह संचालकांवर महाराष्ट्र ठेवीदार हितसंरक्षण कायद्यान्वये (एमपीआयडी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यानंतर भाऊसाहेब व आरती चव्हाण हे दोघे आपल्या कुटुबिंयासह सिंगापूरला पळुन गेले होते़ या दोघांना काही महिन्यांपुर्वीच नाश्कि पोलिसांनी मुंबई विमानतळावरून ताब्यात घेतले होते़ यानंतर या दोघांची राज्यभरात दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये चौकशी करण्यात आली असून ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.
केबीसी कंपनीच्या कार्यालयातून पोलिसांनी गुन्ह दाखल झाल्यानंतर छापा टाकून महत्त्वाची कागदपत्रे, संगणक, हार्डडिस्क तसेच रोख रक्कमही जप्त केलेली आहे़ सद्यस्थितीत सील करण्यात आलेल्या व कुलूपबंद असलेल्या या कार्यालयात आग लागल्याची घटना घडल्याने कार्यालयात आणखी काही महत्त्वाची कागदपत्रे आहेत का? आणि नसतील आग लावण्याचा प्रयत्नाचे कारण काय याबाबत चर्चा सुरू झाली आहे. केबीसी कार्यालयात आग लागल्याची माहिती सिद्धार्थ अग्रवाल या ईसमाने अग्निशमन दलास दिली होती.