ऑनलाइन टीम
मुंबई, दि. २३ - मंत्रालयातील पहिल्या मजल्यावर सोमवारी दुपारी शॉर्ट सर्किटमुळे छोटीशी आग लागली. मंत्री राजेंद्र गावित यांच्या कक्षाजवळ शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली व घबराटीचे वातावरण पसरले. मात्र अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळेवर घटनास्थळी धाव घेत सर्व कर्मचा-यांना सुखरूप बाहेर काढले व आगीवरही नियंत्रण मिळवले. दरम्यान शॉर्टसर्किटनंतर सर्वत्र धूराचे लोळ उठल्याने सुरक्षेच्या कारणास्तव मंत्रालयाचा पहिला मजला रिकामा करण्यात आला आहे.
या आगीमुळे दोन वर्षांपूर्वी मंत्रालयात लागलेल्या भीषण आगीच्या कटू आठवणी जाग्या झाल्या. जून २०१२मध्ये मंत्रालयात लागलेल्या आगीत पाच कर्मचा-यांना जीव गमवावा लागला होता, तसेच अनेक महत्वाची कागदपत्रे व फर्निचर जळून खाक झाले होते.