पुणे : शॉर्टसर्किटमुळे बेकरीला लागलेल्या आगीमध्ये सहा कामगारांचा गुदमरून मृत्यू झाल्याची घटना कोंढव्यातील गगन एव्हेन्यू इमारतीमध्ये पहाटे पावणेपाचच्या सुमारास घडली. बेकरीच्या पोटमाळ्यावर हे कामगार झोपलेले होते. शटरला बाहेरून कुलूप असल्यामुळे बचावकार्यामध्ये अडथळे आल्याची माहिती अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली. इर्शाद खान (वय २६), शानू अन्सारी (२२), झाकीर अन्सारी (२४), फहिम अन्सारी (२४), जुनेद अन्सारी (२५), निशान अन्सारी (२९, सर्व रा. बिजनौर, उत्तर प्रदेश) अशी मृतांची नावे आहेत. अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढव्यातील गगन एव्हेन्यू इमारतीमध्ये ‘बेक्स अॅन्ड केक्स’ नावाची बेकरी आहे. ही इमारत नऊ मजल्यांची असून तळमजल्यावरील २०० स्क्वेअर फूट जागेत बेकरीचे तीन भाग होते. एका भागामध्ये विक्री काउंटर तर मागील भागात स्वयंपाकासाठी जागा ठेवण्यात आली आहे. याठिकाणी बेकरी पदार्थ तयार केले जातात. पोटमाळ्यावर पीठ मळण्यासाठी मोटर बसवण्यात आलेली आहे. तेथेच मोठा ओव्हनही ठेवण्यात आलेला आहे. साधारण चार फूट उंचीच्या पोटमाळ्यावरच दाटीवाटीने सर्व कामगार झोपतात. आग लागल्याची माहिती पहाटे पावणेपाचच्या सुमारास अग्निशामक दलाला मिळाली. जवान बंब घेऊन आले त्यावेळी शटरला बाहेरुन कुलूप होते. ते तोडण्याचा प्रयत्न करीत असतानाच बेकरीचे मालक अब्दुल्ला मोहम्मद युसुफ चिन्नीवार तेथे आले. त्यांनी कुलूप उघडल्यावर जवानांनी आत प्रवेश करुन आग विझवण्याचा प्रयत्न केला. चिन्नीवार याने पोटमाळ्यावर कामगार झोपल्याचे सांगितले. ्त्यानंतर एक जवान पीए सेट घालून पोटमाळ्यावर गेला. त्यावेळी एकमेकांना बिलगून झोपलेल्या अवस्थेतच सहा कामगारांचे मृतदेह पडलेले होते. त्यांचा गुदरमरुन मृत्यू झाल्याचे सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी) बाहेरून कुलूप कशाला? : ही बेकरी अब्दुल्ला मोहम्मद युसुफ चिन्नीवार (वय २७), मुनीर चिन्नीवार (६२, दोघेही रा. कोंढवा) तय्यब अन्सारी (वय २६, रा. सय्यदनगर, हडपसर), यांच्या भागीदारी मालकीची आहे. रात्री कामगारांना आत झोपायला लावून बाहेरून कुलूप लावण्यामागचे नेमके कारण काय, याचा पोलीस शोध घेत आहेत.
बेकरीला आग; सहा जणांचा मृत्यू
By admin | Updated: December 31, 2016 05:02 IST