मुंबई : थोर समाज सुधारक महात्मा जोतिबा फुले यांचे जीवनकार्य राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचावे यासाठी त्यांच्या जीवनावरील चित्रपटाची निर्मिती नामांकित आणि व्यावसायिक संस्थेकडून करण्यात येणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.हा चित्रपट मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तीन भाषांत येत्या एक वर्षात पूर्ण करण्यात येईल. त्यासाठी ई-निविदा मागवून संस्थेची निवड करण्यात येणार आहे. महात्मा फुले यांचे संघर्षमय जीवन व कृतिशील विचारांचा आढावा या चित्रपटात घेण्यात येणार असून तो ऐतिहासिक सत्यावर आधारित असण्यासह या थोर महात्म्याचे जीवनकार्य यथार्थपणे साकारले जावे यासाठी शासनाकडून तज्ज्ञांची समिती स्थापन करण्यात येणार आहे. दर्जेदार चित्रपट निर्मितीचा अनुभव आणि वितरणाची सक्षम व्यवस्था असणाºया संस्थांकडून ई-निविदा मागविण्यात येऊन संस्थेची निवड करण्यात येईल.चित्रपटाचे अर्थकारण, वितरणासाठीचे अत्याधुनिक मार्ग, प्रदर्शनासाठीची नवीन तंत्रज्ञानयुक्त माध्यमे आणि मल्टिप्लेक्समुळे चित्रपट वितरणाचे बदललेले व्यावसायिक गणित याचा विचार निर्मितीसाठी करण्यात येणार आहे. निर्मितीबरोबरच वितरण आणि प्रदर्शनासाठी व्यापक प्रसिद्धीला महत्त्व देण्यात येणार आहे. यासाठी व्यावसायिक कौशल्याचा वापर करून जनतेपर्यंत महात्मा फुले यांचे जीवनकार्य आणि विचार या चित्रपटाच्या माध्यमातून पोहोचतील यादृष्टीने प्रयत्न करण्यात येतील. शासनाकडून या चित्रपटासाठी अनुदान देण्यात येणार आहे.
महात्मा फुले यांच्यावर तीन भाषांत चित्रपट; नामांकित संस्थेकडून निर्मिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 02:06 IST