नवी मुंबई : काँगे्रस-राष्ट्रवादी सरकारने १५ वर्षे फक्त लुटण्याचे काम केले आहे. या निवडणुकीमध्ये परिवर्तन अटळ असून महायुतीची सत्ता आल्यानंतर घोटाळेबाजांवर फौजदारी गुन्हे दाखल करणार असल्याचे मत भाजपा प्रदेश अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे. नवी मुंबईतील विष्णुदास भावे नाट्यगृहामध्ये माजी आमदार मंदा म्हात्रे यांनी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता. या वेळी फडणवीस यांनी आघाडी सरकारवर टीकेची झोड उठविली. सत्ताधाऱ्यांनी राज्याचा सत्यानाश केला आहे. आघाडीच्या काळात फक्त नेते मोठे झाले, जनतेच्या वाट्याला मात्र उपेक्षाच आली. दहशतवादी हल्ल्याला ६ वर्षे झाली तरी मुंबईत सीसी टीव्ही लावण्यात आलेले नाहीत. या घोटाळेबाजांना किती दिवस सहन करणार? येणाऱ्या निवडणुकीत परिवर्तन अटळ आहे. महायुतीचे सरकार आले की सर्व घोटाळेबाजांवर फौजदारी गुन्हे दाखल करणार असल्याचे मतही त्यांनी या वेळी व्यक्त केले. नवी मुंबई स्वत:च्या बापाची समजून येथील सत्ताधारी कारभार करीत आहेत. त्यांचे कंबरडे या निवडणुकीत मोडले जाईल, असेही ते म्हणाले. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनीही सरकारवर टीका केली. या सरकारने काहीच कामे न करता राज्यावर ३ लाख कोटींचे कर्ज करून ठेवले आहे. नवी मुंबईतील सत्ताधाऱ्यांना स्वत:साठी व्हाइट हाऊस बांधायला वेळ आहे, पण अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक बांधता आले नसल्याची टीकाही केली. मेळाव्याचे आयोजक व माजी आमदार मंदा म्हात्रे यांनीही पालकमंत्री गणेश नाईक यांच्या कारभारावर टीका केली. २० वर्षे राष्ट्रवादीत काम केले, परंतु येथील नेतृत्वाने सातत्याने दुय्यम वागणूक दिल्याची टीका केली. सत्ताधाऱ्यांनी एफएसआय व विकासाचे फक्त राजकारण केल्याचे मतही व्यक्त केले. या वेळी माजी आमदार संजय केळकर, विजय चौगुले, वैभव नाईक, विठ्ठल मोरे, सिद्राम होवाळ, विजया घरत व इतर मान्यवर उपस्थित होते.
घोटाळेबाजांवर फौजदारी गुन्हे दाखल करणार
By admin | Updated: July 31, 2014 04:13 IST